राज्यात 17 हजार 531 पोलीस शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पदांची भरती केली जाणार आहे. 5 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून भरतीसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे.
राज्यात 9 हजार 595 पोलीस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलीस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे, 101 बॅंण्डसमन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलींस शिपाई पदे भरली जाणार आहेत. सर्वाधिक पदे बृहन्मुंबई पोलीस दलात होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे भरली जाणार आहेत.
उमेदवारांना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार असल्याने उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
शारीरिक आणि लेखी चाचणी मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
पोलीस भरतीच्या अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येईल.
प्रवर्गनिहाय भरली जाणारी पदे
ईडब्ल्यूएस – 23
एसईबीसी – 24
इमाव – 99
विमाप्र – 13
भ.ज.-ड – 0
भ.ज.-क – 12
भ.ज.-ब – 7
वि.जा.-अ – 10
अ.ज. – 20
अ. जा. – 54
अराखीव 0










































