पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अखेर योगेश बहल यांची नियुक्ती, आज पत्र मिळाले

0
6

पिंपरी, दि. 21 (पीसीबी) : अजित पवार राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर आज (ता.२१) योगेश बहल यांची नियुक्ती झाली.त्यांना तसे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत दिले. त्यांची दुसऱ्यांदा या पदी नियुक्ती झाली आहे.

युतीत राष्ट्रवादीच्या वाट्याच्या शहरातील पिंपरी या राखीव मतदारसंघात पुन्हा पक्षाचा आमदार करण्याची जबाबदारी नव्या अध्यक्षांवर येऊन पडली आहे.तेथे पक्षाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच त्यांनी आपल्या परीने प्रचाराचा धडाका सुरुही केली आहे. शहराचा कॅप्टन म्हणून बहल यांना प्रथम आपला आमदार निवडून, तर आणावाच लागणार आहे. त्यासाठी त्यांचा मोठा कस पिंपरीत लागणार आहे. त्याजोडीने युतीधर्म पाळत भोसरी आणि चिंचवडमधील भाजपचे उमेदवारही निवडून आणण्यास त्यांना हातभार लावावा लागणार आहे. त्याबाबतची भूमिका ते उद्या ते शहरात पत्रकापरिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत.

सहा टर्म नगरसेवक असलेले बहल हे गेल्या सभागृहात सर्वात ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यांनी महापौरांपर्यंत महापालिकेतील सर्व पदे भुषविेली आहेत.अजितदादांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. म्हणूनच पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी टाकली आहे. पूर्वीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावर्षी १६ जुलैला राजीनामा दिला. नंतर त्यांनी घरवापसी केली. भोसरीतून विधानसभेला आघाडीची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

पिंपरी मतदारसंघाच्या बारामती येथील आढावा बैठकीत अजित पवार यांनी ७ ऑक्टोबरला बहल यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती.पण,नंतर ते व तटकरे पक्षाची यात्रा, विधानसभा निवडणुकीची तयारी,जागावाटप आणि उमेदवारीची चर्चा यात गुंतल्याने बहल यांना पत्र मिळण्यास दोन आठवडे लागले.ते मिळताच अडचणीच्या काळात सोपविलेल्या जबाबदारीचे चॅलेंज स्वीकारल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपला आवाजला दिली.ते १९९२ पासून नगरसेवक म्हणून सलग निवडून येत आहेत.