पिंपरी-चिंचवड शहरात 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

0
375

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यासाठी तसेच शहराची विकासात्मक प्रतिमा या माध्यमातून पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन भारतात बंगळूरु, मुंबई, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी होते.  यावर्षी पिंपरी-चिंचवड शहर असे आयोजन करणारे देशातील पाचवे शहर असणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. 

 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यास आणि त्याकामी येणा-या खर्चास स्थायी समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे.  आजच्या बैठकीत  प्रशासक राजेश पाटील यांनी या विषयास मंजूरी दिली.  या विषयास महापालिका सभेची अंतिम मंजूरी घेतली जाणार आहे. 

औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे.  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात या शहराची स्वतंत्रपणे ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.  यासाठी विविध उपक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे.  नुकतेच महापालिकेने राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.  त्यामुळे 6 देशांचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याची संधी हॉकी इंडियाने महापालिकेला दिली आहे.  या शहराला क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होत आहे. 

  क्रीडा विषयक विविध उपक्रम अंमलात आणण्याकामी विविध स्पर्धांचे आयोजन करुन खेळांची आवड निर्माण करणे तसेच त्यातुन नागरिकांचे आरोग्य जोपासणे आवश्यक आहे.  राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये शहरातील  खेळाडूंनी सहभाग घेऊन शहराचा नावलौकिक वाढवावा हा मागील उद्देश आहे.  या पार्श्वभूमीवर महापालिका इंटरनॅशनल मॅरेथॉन आयोजित करणार आहे.    या माध्यमातून शहराचा नावलौकिक वाढून शहरास नवीन ओळख निर्माण होणार आहे.  हा मॅरेथॉनचा उपक्रम 10 वर्षांकरीता असून त्याकरीता सुरुवातीचे पहिले 3 वर्षे 3 कोटी रुपये खर्च महापालिकेचा प्रत्येक वर्षी होईल. या मॅरेथॉनचा खर्च भागविण्यासाठी महापालिका प्रायोजकत्व स्विकारणार आहे.