पिंपरी चिंचवड शहरात १८१ कोरोनाग्रस्त, एका आजोबांचा मृत्यू

0
411

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गग्रस्तांचे प्रमाण वाढू लागले आहे. आजमितीस शहरात १८१ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर एका वृद्धाचा ५ एप्रिल रोजी या आजाराने मृत्यू झाला आहे. तो ३१ मार्च पासून श्वसनाशी संबंधित आजारावर एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी कळविले आहे.

सध्या ५ कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल आहेत. १७६ गृहविलगीकरणात आहेत. सध्या पालिकेकडे कोविड १९ प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. लसीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या आठही रुग्णालयांत कोविड १९ रुग्णांकरिता तपासणी उपकरणे मोफत उपलब्ध आहेत. ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी, येथे कोविड १९ रुग्णांकरिता लागणारे सर्व औषधोपचार व पुरेशा खाटा मोफत उपलब्ध आहेत व गरज भासल्यास नविन थेरगांव रुग्णालय, नविन भोसरी रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय व वायसीएम रुग्णालय येथे कोविड १९ रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता त्वरित करण्यात येईल असेही गोफ़णे यांनी म्हटले आहे.

कोविड १९ आजारास घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना/रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड १९ तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा मास्क चा वापर करावा. असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.