चालू आर्थिक वर्षात ४ लाखांहून अधिक नागरिकांनी भरला मालमत्ता कर!
पिंपरी, दि. २४ – शहरात ज्या निवासी किंवा बिगरनिवासी मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे, अशा मालमत्ताधारकांवर महापालिका कठोर कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. शहरात ७ लाख ३१ हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख २६ हजार मालमत्ताधारकांनी चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा केला आहे. तसेच, आतापर्यंत एकदाही मालमत्ता कर न भरलेली ३४ हजार २२ इतकी संख्या असून, अशा मालमत्ताधारकांवर महापालिका कठोर कारवाईस सुरुवात करणार असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेने पहिल्या तिमाहीत ५२२ कोटींचे कर वसूल करून विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कर संकलनाचे कामकाज सुरू आहे.
शहरात ५० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्यांची संख्या : २८ हजार ५१८
एक लाखांहून अधिक थकीत असणाऱ्या मालमत्तांची संख्या : ९ हजार १४७
पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक मालमत्तांची संख्या : ८७५
थकबाकीदारांना बजावण्यात आली नोटीस
मालमत्ता बिलासोबत थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही वारंवार मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत. कर न भरल्यास मालमत्ताही जप्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे. तात्काळ कर न भरल्यास कारवाई अटळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील थकीत १ लाख १२ हजार ८०९ निवासी मालमत्ताधारकांकडे ३१० कोटींचा थकीत कर आहे. ज्या निवासी मालमत्ताधारकांकडे ५ किंवा १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून थकबाकी आहे, अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही, फ्रिज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या मार्फत करण्यात येणार आहे.
ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत!
पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेस नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मात्र अद्यापही काही मालमत्ताधारकांनी एकदाही मालमत्ता कर भरलेला नाही. अशा थकबाकीदारांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. ५ किंवा १० वर्षांपेक्षा अधिक काळ थकबाकी असलेल्या मालमत्तांधारकांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ताही जप्ती करण्याची कारवाई अटळ आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी विभागीय कार्यालयांमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी ऑनलाइन कर भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. मोबाईलवरून सहज कर भरता येतो, त्यामुळे प्रत्येकाने आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी मालमत्ता बिलाशी जोडावा, जेणेकरून सर्व सुविधा घरबसल्या मिळू शकतील असे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.