पिंपरी चिंचवड शहरातील १७ ठिकाणी रा.स्व संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

0
78

पिंपरी, दि.७ – संघाच्या गणवेशातील शिस्तबध्द स्वयंसेवक, घोषपथकाचे रणभेदी वादन, अंगावर शहारा आणणारी शारीरिक प्रात्यक्षिके, सुमधुर व राष्ट्रभक्तीने ओतप्रोत सांघिक व वैयक्तिक गीते अशा भारावलेल्या वातावरणात मान्यवरांनी भगव्या ध्वजाला प्रणाम करून पारंपरिक शस्त्रपूजन केले निमित्त होते पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १७ ठिकाणी संपन्न झालेल्या विजयादशमी उत्सवाचे.

शहरातील निगडी, चिखली, संभाजी नगर, देहू, चिंचवड पूर्व, पिंपरी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, काळेवाडी – रहाटणी, संत तुकाराम नगर, आकुर्डी, हिंजवडी, रावेत, थेरगाव, वाकड, पूनावळे या भागात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संघाचा विजयादशमी उत्सव मान्यवर व बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थिती संपन्न झाला सर्वच ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. चौंढे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या पिंपळे निलख नगरातील उत्सवात अर्जुन खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत तर चिखली येथील उत्सवात ह.भ.प.सुवर्णा कुलकर्णी या महिला मान्यवर प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर स्थानापन्न होत्या हे विशेष. समाजातील विविध क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे प्रमुख पाहुणे कार्यक्रमांना उपस्थित होते.
समाजासमोरील आव्हाने स्वयंसेवकांची कर्तव्ये आणि शताब्दी वर्षात प्रवेश करणारा संघाच्या वाटचालीबद्दल वक्त्यांनी मांडणी करून जास्तीत जास्त नागरिकांनी संघकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन
विजयादशमी निमित्याने
शहरातील २६ ठिकाणी प्रमुख मार्गावर विजयादशमी रोजी घोषाच्या तालावर स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन निघणार असून देहूरोड, आळंदी, मोशी, दिघी, इंद्रायणी नगर, भोसरी, चऱ्होली या नगरांचे उत्सव शनिवार दि.१२ रोजी तर पिंपळे सौदागर, चिंचवड पश्चिम नगराचा उत्सव १३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली.

संघाच्या शताब्दी वर्षातील पंचसूत्री –

  • कुटुंब प्रबोधन
  • सामाजिक समरसता
  • पर्यावरण संवर्धन
  • ‘स्व ‘बोध
  • नागरिक कर्तव्य

संघाच्या शताब्दी वर्षात आपला समाज सक्षम व निर्दोष होण्यासाठी संघाने येत्या काळात पंचसुत्रीवर भर देण्याचे ठरवले आहे. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, ‘स्व ‘ बोध, पर्यावरण संवर्धन आणि नागरी कर्तव्ये हे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यायला हवे. समाज निर्दोष व संघटित होण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी समजून नित्य नियमाने करण्याची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा समावेश अगदी सहजपणे करता येईल आणि त्याचा परिणाम फक्त कौटुंबिक पातळीवर नव्हे तर भविष्यात जगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल यात शंका नाही, असे आवाहन स्वयंसेवकांना उत्सवातून करण्यात आले आहे