पिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधवांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

0
263

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला साथ देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मराठा संघचटनांनी मिळून गेली दहा दिवस धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, वाकड, रहाटणी आदी शहराच्या विविध भागांतून तसेच मावळ तालुक्यातील बहुतांश सर्वच गावांतून मोर्चे, धरणे आंदोलनालाही मोठा प्रतिसाद आहे. आज सकाळी आकुर्डी येथील तहसिल कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक दिवसांपासून मराठा बांधवांनी लाऊन धरली आहे. आकुर्डी येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाने आकुर्डी येथील तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला.

सकाळी अकरा वाजता मराठा बांधवांनी आकुर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर एकत्र येऊन एक मराठा – लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाच्या बाबत राज्य शासनाची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. शासनाने लवकरात लवकर आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, असे यावेळी सांगण्यात आले. शहरातील खासदार-आमदार यांनी आपली भूमिका स्पष्ट कऱण्याची मागणी अनेकांनी केली. त्यानंतर हा मोर्चा आकुर्डी येथील तहसिल कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. खंडोबा माळ चौक ते आकुर्डी तहसिल कार्यालय या दरम्यान हा पायी मोर्चा निघाला. आकुर्डी येथे तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर घोषणा देण्यात आल्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण, मशाल मोर्चा, निषेध मोर्चा अशा विविध प्रकारे शासनाचे लक्ष वेधून मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिसक वळण लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी हा आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला एक आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटला आहे. गुरुवारी राज्य शासनाचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे. त्यात सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर या आंदोलनाला आणखी वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.