पिंपरी चिंचवड शहरातही कोयता गँगची दहशत

0
906

पिंपरी, दि. १० (पीसीबी) : शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली सोमवारी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले. हातातील कोयते हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.

निलेश फकिरा काळे (वय ३१, रा. दिघी, मुळ – लोहारा, जळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल जनार्धन सकट (वय ३२), दिपक रामकिशन हजारे (वय २७, दोघे रा. लांडेवाडी, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार पवन छगन उजगरे (रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी काळे हे त्यांचा मित्र साजन शेलार समवेत भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली उभे होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचे असलेले तीनही आरोपी तेथे आले. आरोपी सकट याने फिर्यादीच्या अंगावर कोयता उगारून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना मारहाण केली.

तसेच, आरोपीने कोयत्याने वार करत त्यांच्या कानाला दुखापत केली. त्यानंतर आरोपी सकट याने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेले एक हजार रुपये काढून घेतले. तर, आरोपी हजारे याने फिर्यादी यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर आरोपी उजगरे याने फिर्यादी यांच्या पँटच्या खिशातील ७०० रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. फौजदार खाडे तपास करीत आहेत.