पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर, मनसेचे आंदोलनाचा इशारा

0
236

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहत चालला आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणून महापालिका व वाहतूक पोलीस दोघांचीही संयुक्तिक जबाबदारी असून आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.अन्यथा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरातील वाहतूक कोंडीच्या विरोधात विरोधात उग्र आंदोलन करून, न्यायालय मध्ये दावा करू असा इशारा मनसेने दिला आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या प्रगतीमध्ये खाजगी प्रवासी वाहतूक हा एक अविभाज्य तसेच अत्यावश्यक सेवा असून या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक ते दोन हजार कुटुंब आपला उदारनिर्वाह करत आहेत. या व्यवसायाशी निगडित अनेक छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहेत. हा व्यवसाय अत्यावश्यक सेवे असूनही आजपर्यंत महापालिकेकडून दुर्लक्षित राहिलेला आहे. शहरात देशाच्या विविध भागातून बस येतात.

शहरात फक्त ट्रक टर्मिनस उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यात भरच पडलेली असून ट्रक वाहतूकदारांचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. त्याचप्रमाणे खाजगी बस वाहतूकदारांसाठी शहराच्या सौंदर्याच्या दृष्टीने व वाहतूक सुरळीत होण्याच्या मुख्य उद्देशाने खाजगी बस थांबा पिकपची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शहरांमध्ये बस एकाच ठिकाणी थांबून सुटण्याची सोय महापालिकेने त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जागा लवकरात लवकर देण्यात यावी.

शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यावरती प्रामुख्याने निगडी, चिंचवड, थेरगाव, काळेवाडी, नवी सांगवी, नाशिक फाटा, भोसरी, चिखली, थरमॅक्स चौक, यमुनानगर, कस्पटेवस्ती वाकड, वाल्हेकरवाडी भागांमध्ये नियमित वाहतूक कोंडी होत असून प्रामुख्याने वाहतूक कोंडी या बस रस्त्यावरती उभे राहिल्याने होत आहेत. या व्यवसायाशी निगडित लोकांना याबाबत तोडगा काढण्याचा विनंती केली असता त्यांनी आम्हाला शहराच्या एका साईटला जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केलेली आहे.

याविषयी पिंपरी-चिंचवड शहर ट्रॅव्हल असोसिएशन सातत्याने पाठपुरावा करत आहे. तत्कालीन पोलीस वाहतूक उपायुक्त आनंद भोईटे यांनी व बीआरटी विभागाचे बापू गायकवाड यांनी एक जागा पाहून निश्चित केलेली समजते. तसेच यावर्षी वाहतूक शाखेचे नवीन उपायुक्त बापू बांगर व बापू गायकवाड यांनीही नव्यानेच जागा पाहून निश्चित केलेले आहे.

शहराच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍न विषयी आपण सहानुभूतीने लक्ष घालावे. शहरातील नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका द्यावी. निगडी मध्ये लवकरच मेट्रोचे काम चालू होणार असून वाहतूक कोंडीचे अजून दुष्परिणाम दिसून येतील. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्याने या विषयावरती तोडगा काढावा. अन्यथा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरातील वाहतूक कोंडीच्या विरोधात विरोधात उग्र आंदोलन करून, न्यायालयामध्ये दावा करेल, असा इशारा देण्यात आला आहे