पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0
1

 दि . 16 (पीसीबी)- पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया, पिंपरी चिंचवड महापालिका सीएसआर प्रमुख विजय वावरे, निवृत्त पोलिस अधिकारी व पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे अनिल गालींदे, मोहन लोंढे, गजानन चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, सुनील पोटे, मल्लाप्पा कस्तुरे आदी उपस्थित होते. यावेळी सातुर्डेकर म्हणाले की,आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा दिवस केवळ आनंदाचा नाही, तर आपल्याला इतिहासाची, बलिदानाची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा आहे.१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाने गुलामीची बेडी तोडली. हे स्वातंत्र्य लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने, त्यागाने आणि अथक संघर्षाने मिळाले. आज आपली जबाबदारी आहे की देशाने माझ्यासाठी काय केले याचा विचार करण्याऐवजी मी देशासाठी काय केले याचा विचार करून देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी व काम प्रामाणिकपणाने केले तरी देश जगात महासत्ता होईल असे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांनी विज्ञान केंद्राबाबत माहिती दिली. पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र व तारांगण प्रकल्पास दरवर्षी साधारण तीन लाख विद्यार्थी शिक्षक व विज्ञान प्रेमी भेट देतात असे त्यांनी सांगितले. आर्यभट्ट ते गगन यान हे विशेष प्रदर्शन 12 ऑगस्ट पासून सुरू झाले असून हे प्रदर्शन 24 ऑगस्ट पर्यंत चालणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपरिया यांनी दिली.