दि.१४(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होणार असतानाही महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. शहरातील लोकसंख्या, महापौर आरक्षण लागू झाल्यापासूनचा आरक्षणाचा तपशील पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य शासनाला सप्टेंबर २०२५ मध्ये पाठविला आहे. मात्र, अद्याप सरकारने हे आरक्षण जाहीर केलेले नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या, गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी (१६ जानेवारी) मतमोजणी होणार आहे. असे असताना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अद्याप महापाैरपदाचे आरक्षण जाहीर केलेले नाही. राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजपर्यंतच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग, त्यांची नावे, आरक्षणाचा कालावधी सुरू झाल्याची आणि आरक्षण संपुष्टात आल्याची, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती मागविली होती.
त्यानुसार महापालिकेने २००१ पासूनचा आरक्षणाचा सविस्तर तपशील राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. आता केवळ अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण राहिले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ‘एससी’चे आरक्षण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. त्यात प्रकाश रेवाळे (इतर मागास प्रवर्ग), मंगला कदम (महिला खुला प्रवर्ग), डॉ. वैशाली घोडेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), अपर्णा डोके (नागरिकांचा मागास प्रवर्ग), योगेश बहल (खुला प्रवर्ग), मोहिनी लांडे (महिला खुला प्रवर्ग), शकुंतला धराडे (अनुसूचित जमाती), नितीन काळजे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), राहुल जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), उषा ढोरे (महिला खुला प्रवर्ग) यांचा समावेश आहे.
महापाैरपदाचे आरक्षण राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत काढले जाते. अद्याप आरक्षण काढण्यात आलेले नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.









































