पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अजितदादांच्या बरोबर, तर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप साहेबांच्या मागे

0
350

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कोणाकडे झुकणार याबाबत मोठ्या संभ्रमात आहेत. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण साहेबांच्याच बरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे दिसले. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजितदादा पवार यांना आज सकाळीच मुंबईतील निवासस्थानी भेटून आले.

राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार यांनी ३० आमदारांसह भाजप बरोबर हात मिळवणी केली. यापुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ चिन्हावरच लढणार असल्याचे स्वतः अजितदादा पवार यांनी रविवारीच जाहीर केले. दुसरीकडे शरद पवार यांनी आपण नव्या दमाने राज्य पिंजून काढू आणि पुन्हा पक्ष उभा करणार असल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वातावरण निवळेल तोपर्यंत तटस्थ राहणे अनेकांनी पसंत केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना आपण शरद पवार साहेब यांच्या बरोबर असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर कराड, सातारा दौऱ्यात त्यांच्या समवेत सहभागी होण्यासाठी ते रवाना झाले. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे तसेच अनेक जुनेजाणते नेते, कार्यकर्त्यांचा कल साहेबांकडे आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीत काल पासून मोठा गोंधळ होता, पण बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज सकाळीच मुंबई गाठली आणि दादांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या पाठोपाठ माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे मोरेश्वर भोंडवे यांनी मुंबईत अजितदादांची भेट घेऊन अभिनंदन केले.

माजी आमदार विलासशेठ लांडे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र ते शरद पवार यांचे निस्सिम भक्त असल्याने त्यांचा कल साहेबांकडे असल्याचे समजले. विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे हे कराड येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते.