पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहावर; भाजप–राष्ट्रवादीत वाटप निश्चित

0
142

दि.२०(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने मार्च २०२३ मध्ये आदेश जारी केले असून, महापालिकेच्या एकूण संख्याबळाचा विचार करता स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी महापालिकेत केवळ पाच स्वीकृत नगरसेवक होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८४ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या असून शिवसेना, काँग्रेस व इतर पक्षांचे संख्याबळ तुलनेने कमी आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीत मुख्यतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच संधी मिळणार आहे.

संख्याबळाच्या आधारावर करण्यात आलेल्या विभागणीनुसार, भाजपला ७ स्वीकृत नगरसेवक पदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ स्वीकृत नगरसेवक पदे देण्यात येणार आहेत.

भाजपकडून या सात जागांसाठी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेले पदाधिकारी, निवडणुकीत पराभूत झालेले पण प्रभावी नेते, तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची नावे चर्चेत आहेत. पक्षासाठी आर्थिक, संघटनात्मक आणि प्रचारातील योगदान लक्षात घेऊन उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, अंतिम यादी ठरवताना पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या तीन स्वीकृत जागांसाठीही पक्षांतर्गत चढाओढ सुरू आहे. निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले उमेदवार तसेच शहर पातळीवरील अनुभवी नेत्यांना संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. महापालिकेतील आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही ही निवड अत्यंत रणनीतीने केली जाणार असल्याचे संकेत आहेत.

स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे संख्याबळ आणखी मजबूत होणार असून, याचा परिणाम स्थायी समिती, विषय समित्या तसेच विविध महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियांवर दिसून येणार आहे.आता दोन्ही प्रमुख पक्षांकडून कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.