पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू!

0
5

विहिरीत पडलेल्या बैलाची केली सुखरूप सुटका

पिंपरी,१८(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक येथील वडमुखवाडी भागातील तापकीरनगर परिसरात एका विहिरीत बैल पडल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या चोवीसवाडी उप-अग्निशमन केंद्रातील पथकाने घटनास्थळी धाव घेत विहिरीमध्ये पडलेल्या बैलाला स्थानिकांनी बोलविलेल्या क्रेनच्या व स्थानिक मदतीला धावून आलेल्या नागरिकांच्या सहाय्याने बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी गेल्यानंतर विहिरीमधून बैल बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी क्रेन बोलवली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने आणि स्थानिकांच्या मदतीने पथकाने बचावकार्य सुरू केले. विहिरीत उतरून रेस्क्यू बेल्ट आणि दोरीच्या मदतीने बैलाला विहिरीतून सुखरूप बेल्टच्या साह्याने बांधून बाहेर काढले. या बचावकार्यामध्ये चोवीसावाडी उप-अग्निशमन केंद्राचे जवान अमोल रांजणे, विशाल पोटे, ऋषिकेश रांजणे, शुभम बोराडे, संस्कार चव्हाण, सचिन ठोसरे यांनी सहभाग घेतला.
चौकट-
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, महापालिका अग्निशमन विभाग आपल्या मदतीसाठी तत्पर आहे.

घटना समजताच अग्निशमन दलाने दाखवलेली तत्परता, शिस्तबद्ध कामगिरी आणि समन्वय खरोखर कौतुकास्पद आहे. जीवित सुरक्षेला प्राधान्य देणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी असून अशा बचावकार्यातून दलाचे कौशल्य आणि सज्जता अधोरेखित होते. भविष्यात आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रतिसादाचा वेग आणि कार्यक्षमता अधिक वाढवण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढताना आमच्या जवानांनी दाखवलेले धैर्य, कौशल्य आणि समर्पण उल्लेखनीय आहे. महापालिकेचा आपत्कालीन यंत्रणा विभाग नेहमीच सज्ज असून नागरिकांनी अशा प्रसंगी विलंब न करता अग्निशमन विभागाशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे.
– संदीप खोत, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

घटना समजताच आमच्या पथकाने तात्काळ कारवाई केली आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले. विहिरीचा खोली अधिक असल्याने आणि जनावर घाबरलेले असल्याने आव्हान वाढले होते, परंतु प्रशिक्षित जवानांच्या मदतीला स्थानिक मंडळी धावून आल्याने टीमवर्कमुळे बैलाला सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले. अशा घटनांमध्ये नागरिकांनी जागरूक राहून तातडीने माहिती देणे व घटनास्थळी अग्निशमन पथकाच्या सूचनांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
– ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका