पिंपरी,दि.२८(पीसीबी) -पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात होणाऱ्या जनसंवाद सभांसाठी नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. प्रदीप ठेंगल हे जबाबदारी पाहत आहेत.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत वेळोवेळी जनसंवाद सभा आयोजित केल्या जातात. या सभांदरम्यान नागरिकांच्या अडचणी, मागण्या व सूचना प्रभावीपणे नोंदविणे, त्यांचे संकलन करणे आणि आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे या दृष्टीने समन्वय राखला जावा, तसेच नागरिकांच्या सोयीकरिता माहितीचे संकलन एका ठिकाणी व्हावे आणि विविध विभागांमधील समन्वय सुलभतेने व्हावा, या उद्देशाने प्रत्येक जनसंवाद सभेसाठी नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख डाॅ.प्रदीप ठेंगल यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, असे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे












































