पिंपरी चिंचवड महापालिकेने पुराने बाधित झालेल्या भागातील ९५० नागरिकांचे सुरक्षित स्थळी केले स्थलांतर

0
1

अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज, निवारा केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध

पिंपरी, (पीसीबी) दि. २० – पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या पाणी विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. महापालिकेने काल (१९ ऑगस्ट २०२५) रात्रीपासूनच पुराने बाधित झालेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरु केले असून आज सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातील सुमारे ९५० नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये स्थलांतरीत केले होते. या ठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

आयुक्त शेखर सिंह हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांनी देखील प्रत्यक्ष पूर बाधित भागाला तसेच येथील नागरिकांना स्थलांतरीत केलेल्या स्थळांना भेट देऊन पाहणी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आज सकाळी ८ वाजेपर्यंत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पुराने बाधित झालेल्या भाटनगर परिसर, पिंपरी येथील सुमारे ७५ नागरिकांना कै. नवनाथ दगडू साबळे शाळा, बुद्धविहार भाटनगर व चेकान दास मेवाणी सभागृह भाटनगर येथे स्थलांतरित केले आहे. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पूराने बाधित झालेल्या लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी परिसरातील ६२८ नागरिकांचे स्थलांतर म्हाडा वेलींग किवळे येथील म्हाडा सदनिका व वाल्हेकरवाडी शाळा येथे करण्यात आले आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पुराने बाधित झालेल्या पिंपळे निलख पंचशील नगर परिसरातील ३२ नागरिकांना पिंपळे निलख प्राथमिक विद्यालय क्र. ५२, ५३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पूराने बाधित झालेल्या रामनगर बोपखेल भागातील ४५ नागरिकांचे स्थलांतर रामनगर बोपखेल पिंपरी चिंचवड मनपा शाळा येथे करण्यात आले आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर हा भाग पुराने बाधित झाला असून येथील १२५ नागरिकांचे कमला नेहरू शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे. तर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पूराने बाधित झालेल्या पिंपळे गुरव लक्ष्मीनगर भागातील ४५ नागरिकांना भगतसिंग शाळा, गुलाबनगर, पिंपळे गुरव प्राथमिक विद्यालय क्र. ५४ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या काही कामगारांना म्हाडाच्या घरामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी केली वाहनांची व्यवस्था

शहरातील नदीकाठावरील पुराने बाधित होऊ शकणाऱ्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाकडील तसेच अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा विभाग यांच्याकडील पथके तैनात करण्यात आलेली आहेत. सदर ठिकाणी अग्निशमन विभागाचे बंब, बोट, रुग्णवाहिका, बाधित नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी मदत केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ड्रेनेज चोकअप होणे, रस्त्यावर पाणी साचणे या स्वरूपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयामार्फत सदर ठिकाणी टीम पाठवून त्या तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे.

जलद प्रतिसाद यंत्रणा तैनात

पिंपरी चिंचवड शहरात व धरण क्षेत्रामध्ये पावसामुळे मुळशी व पवना धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची सविस्तर माहिती सातत्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून घेतली जात आहे. महापालिकेकडून पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या लगतची वस्ती, सोसायटी व भाग या ठिकाणी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असून प्रतिसाद यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून सर्च अँड रेस्क्यू टीम्स उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे नजीकच्या ठिकाणी मदत केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था व त्याप्रमाणे आवश्यक आरोग्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. विविध माध्यमांद्वारे नागरिकांना वेळोवेळी पूर परिस्थिती, अतिवृष्टी, धरणातील विसर्ग याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पिंपरी चिंचवड शहरामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने संपर्क करता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. या कक्षामधून सी-डॅक, हवामान विभाग यांच्याशी समन्वय ठेवून हवामानाविषयी माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवण्यात आला आहे. सिंचन विभागाशी समन्वय साधून दर तासाला पाण्याच्या विसर्गाची अद्ययावत माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षात आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस बिनतारी यंत्रणा, अग्निशमन विभाग, स्थापत्य विभाग, मलनिःसारण विभाग अशा विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्तांकडून पूर परिस्थितीची पाहणी

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यामध्ये भाटनगर परिसरातील पूरबाधितांना स्थलांतरीत करण्यात आलेल्या कै. नवनाथ दगडू साबळे शाळेला आयुक्त सिंह यांनी भेट दिली. तसेच सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत स्थलांतरित कुटुंबीय यांची व्यवस्था पाहणी केली. याठिकाणी त्यांनी संबंधित स्थलांतरीत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
…..
पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता सतर्क राहावे. शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा भागावर महापालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. पुराने बाधित होणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात असून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका