पिंपरी, दि. २७(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्र. २१ पिंपरी येथील महापालिका शौचालयामधील तसेच जिजामाता हॉस्पिटलमधील स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यास येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर तसेच प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव परिसरात विकास कामांची व इतर स्थापत्य विषयक कामांसाठी तसेच अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविणेकामी मशिनरी पुरविणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर रुफ टॉप सोलर यंत्रणा प्रदान करणेबाबत, भोसरी येथील स्मशानभुमी येथील विद्युतदाहीनी, प्रदुषित हवा नियंत्रण यंत्रणा व विविध विद्युतसंच मांडणी यांची वार्षिक पद्धतीने चालन, देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील इ. १० वी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थीनीला उर्वरित प्रोत्साहनपर बक्षिस अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. आकुर्डी गंगानगर, आकुर्डी गावठाण, सुदर्शननगर, लोकमान्य हॉस्पिटल, भोईर कॉलनी, काळभोरनगर, मोहननगर, निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २१ ते २८ व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ येथील नवीन ग क्षेत्रीय कार्यालय व इतर मनपा इमारतीमध्ये तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील दुर्गा देवी उद्यान, भक्ती शक्ती उद्यान व इतर उदयानाचे स्थापत्य विषयक कामे करणेबाबत, वैद्यकीय विभागातील इतर सर्व रुग्णालयाकरिता आवश्यक ओटी टेबल खरेदीबाबत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ विभागास लहान बेंचेस खरेदीबाबत, क्रीडा विभागाकडील शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३ करिता साहित्य खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
विजयनगर, आनंदनगर झोपडपट्टी, वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी, प्रभाग क्र. ३ मध्ये चऱ्होली भागात, मोरवाडी, दत्तनगर, संभाजीनगर, शाहुनगर तसेच इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिघी बोपखेल भागात, प्रभाग क्रमांक ३ मध्ये मोशी भागात, प्रभाग क्रमांक ५ मध्ये संत तुकाराम नगर गवळी नगर तसेच इतर भागात आवश्यकतेनुसार डी आय एच डी पी पाईपलाईन टाकणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २१ पिंपरीमध्ये पिंपरी कॅम्प व इतर परिसरात फुटपाथ व पावसाळी गटरचे सुधारणा विषयक कामे करणेबाबत, प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर व प्रभागातील इतर परिसरात रस्त्यावरील दुभाजक, बोर्ड, बेंचेस दुरूस्ती करणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ पुनावळे व ताथवडे तसेच प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव येथे मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता व मनपाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता विविध ठिकाणी मंडप व्यवस्था पुरविणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील नाशिक फाटा सेक्टर नंबर ५०२ ते सेक्टर नंबर ४९६ पर्यंत पवना नदीलगत शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंतचा अद्ययावत पद्धतीने विकसित करणेबाबत, टेल्को रस्त्यावर बालाजीनगर येथे सी. डी वर्क बांधणे व इतर अनुषंगिक विषयक कामे करणेबाबत, फ प्रभाग आणि ह प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी सी. सी. टी. व्ही यंत्रणा उभारणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिका दवाखाने, रुग्णालयांकरिता जैव वैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावणेकामी नॉन क्लोरोनेटेड लाल व पिवळा रंगाच्या बॅगा खरेदीकामी येणाऱ्या खर्चास तसेच पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी ओएफसी केबल डक्ट टाकणे व खोदलेला रस्ता पूर्ववत करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.