दि.१४(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या (गुरुवारी) होणारे मतदान आणि शुक्रवारी होणारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सह पोलीस आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, विविध पथकांच्या कंपन्यांसह ६ हजार ९१ पोलीस सज्ज असणार आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ५० उपद्रवींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुंडगिरी प्रवृत्तीच्या ४३८ जणांना शहराच्या हद्दीबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १ हजार ३०६ पिस्तुले जमा केली आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त, सह आयुक्त, दोन अपर पोलीस आयुक्त यांच्यासह ६ हजार ९१ पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणार्या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणार्या केंद्रांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.
महापालिका निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहेत. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४२० इमारतींमध्ये २ हजार १३५ मतदान केंद्र आहेत.
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण ३४ तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याकरीता ६८ पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. आजपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत दैनंदीन तपासणी दरम्यान एकूण १६ लाख १७ हजाराची रोकड जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. निवडणूक अनुषंगाने परवानाधारकांची एकूण १ हजार ३०६ पिस्तुले जमा केली आहेत.
अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई
आचारसंहिता लागू झाल्यापासून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत २७६ छापे घालून एकूण १० लाख ३६ हजार ९७२ रूपये किमतीचा मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यांअंतर्गत १८ छापे घालून एकूण ६६ लाख १९ हजार रूपये किमतीचा गांजा, एमडी, ओजी कुश गांजा असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. नऊ बेकायदा पिस्तुले जप्त केली असून ११ जणांना अटक केली आहे.
पोलीस सह आयुक्त : १
अपर पोलीस आयुक्त : २पोलीस उपायुक्त : ८सहायक पोलीस आयुक्त : ११पोलीस निरीक्षक : ४८सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक : २९१अंमलदार : ३७३३होमगार्ड : २०००दंगा नियंत्रण पथक : ४शिघ्र प्रतिसाद दल : २ कंपनीराज्य राखीव पोलिस दल : १ कंपनी
‘निवडणूक निर्भय वातावरण, निप:क्षपाती, शांतता व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय सुसज्ज आहे. नागरिक पोलिसांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न घाबरता देऊ शकतात. पोलिसांना येणार्या प्रत्येक फोनची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तसेच, सर्व नागरिक, कार्यकर्ते यांनी नियमांचे पालन करून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.









































