पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

0
13

शिक्षण विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा; नाविण्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतूक

पिंपरी, दि. २५ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला. महापालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना डीबीटीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करतानाच अशा उपक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पांचा समावेश करून प्रशिक्षण अधिक अद्ययावत व गुणवत्तापूर्ण करावे, असे मत मांडले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी शिक्षण विभागाची सक्षम हस्तपुस्तिका, इंग्रजी हस्तपुस्तिका, डिजिटल लर्निंग बालवाडी दिनदर्शिका, प्राथमिक दिनदर्शिका, पालक दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला वस्तू देऊन सन्मान केला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रशासनाधिकारी संगीता बांगर आदी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रगतीचे आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण केले. शिक्षण क्षेत्रात झालेल्या लक्षणीय बदलांची माहिती यावेळी आयुक्त सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ झाली असून यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांपर्यंत घटले आहे, तर प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. प्राथमिक स्तरावरील इंग्रजी कौशल्य विकासात सरासरी १८ टक्के वाढ दिसून आली असून बालवाडीमध्ये २५ टक्क्यांची गुणात्मक वाढ आणि ६ टक्के प्रवेश वाढ नोंदवली गेल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली. तसेच शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहितीही यावेळी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका संचालित मोरवाडी व कासारवाडी येथील आयटीआय अभ्यासक्रम, आयटीआय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल, भविष्यात विद्यार्थ्यांना कोणते नवीन ट्रेडस्‌ व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली.
…….
‘या’ विद्यार्थ्यांचा झाला सन्मान!

स्वप्नाली झिंजे – निगडी माध्यमिक शाळा (९६.००%)

महतो धीरेंद्रकुमार गजेंद्र – खराळवाडी माध्यमिक शाळा (९०.८०%)

गायत्री संतोष बीजमवर – काळभोर नगर माध्यमिक शाळा (९४.४०%)

इशा शशिकांत पाटील – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९७.६०%)

श्रावणी दीपक टोणगे – छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा, कासारवाडी (९३.००%)