पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना हटवा

0
102

दि ६ जुलै (पीसीबी ) – अमोल थोरात यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पिंपरी : निवडणूक न झाल्याने २०२२ पासून महापालिकेत ‘प्रशासक’राज आले. त्याचवेळी पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. प्रशासक म्हणून त्यांनी पारदर्शी आणि उत्तम कामगिरी बजावणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी शहरवासीयांना तसेच माजी नगरसेवक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एककल्ली कारभार चालवला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनात अनागोंदी असून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांना हटवून सक्षम अधिकाऱ्याची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, शेखर सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू ठेवले आहे. टीडीआर वाटप करण्यात मोठा घोळ झाला आहे. टीडीआर घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. त्यानंतर एका बड्या बिल्डरला रस्ते खोदाई प्रकरणात पाठीशी घालून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणातही महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भाजपने भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कामकाजाचे अभिवचन देत महापालिकेत सत्ता मिळवली होती. त्यामुळे भाजप पक्षाकडून शहरवासीयांना अपेक्षा आहेत. शहरवासीयांमध्ये भाजपची सकारात्मक प्रतिमा आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून पिंपरी- चिंचवड शहरातील मतदारांनी भाजपवर विश्वास दर्शविल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शेखर सिंह यांची कार्यशैली संशयास्पद आहे. तसेच राज्यभरातून पालखी सोहळ्यासाठी आलेले भाविक व वारकरी यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या काळात शेखर सिंह प्रदीर्घ रजेवर गेले. पालखी सोहळ्या दरम्यान प्रशासक म्हणून तसेच शासनाचा प्रतिनिधी म्हणून शेखर सिंह यांनी पालखी सोहळ्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र ते नेहमीप्रमाणे याबाबतही उदासीन असल्याचे दिसून आले.

कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी न ठेवता तसेच शहराच्या हितासाठी काम न करता प्रशासनावर वचक न ठेवता अनागोंदी व भोंगळ कारभार होण्यास शेखर सिंह जबाबदार आहेत. यातून पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांच्या पैशांचा गैरवापर होऊन लुट होते आहे. महापालिकेचा प्रशासकीय कारभार असाच सुरू राहिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मुद्दा मिळून भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त पदावरून शेखर सिंह यांना हटवून महापालिका आयुक्तपदी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनातून केली आहे.