पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी अनुभवी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. आगामी काळातील महापालिकेचे कामकाज आणि राजकीय रणनीती लक्षात घेता, पक्षाने एका अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाकडे ही धुरा सोपवली आहे.
अनुभवी नेतृत्वावर विश्वास
प्रशांत शितोळे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे प्रदीर्घ संसदीय कामाचा अनुभव असून, यापूर्वी त्यांनी ( Prashant Shitole) महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शहराचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आणि आता त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी पक्षाने त्यांना गटनेतेपद दिले आहे.
विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी
नवनियुक्त गटनेते प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन ८४ नगरसेवकांच्या गटाची अधिकृत ( Prashant Shitole) नोंदणी केली. यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप हे देखील उपस्थित होते. गटनेते म्हणून निवड झाल्यानंतर प्रशांत शितोळे यांच्यावर आता सभागृहात पक्षाची बाजू मांडण्याची आणि ८४ नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.








































