महिला बचत गटांमार्फत खाद्यपदार्थ, हस्तकला आणि वस्त्रनिर्मिती व्यवसायाच्या विक्रीतून दरमहा १० लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित
पिंपरी, दि.१२ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथे महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या खाद्य पदार्थ केंद्रातील ४९ गाळ्यांचे महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी भारतातील पहिला ई- लिलाव घेण्यात आला होता. या खाद्यपदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे मराठी नाव देण्यात आले तसेच या केंद्राच्या प्रतिकचिन्ह (लोगो) देखील निश्चित करण्यात आले. या केंद्राचे संचालन पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विक्री केंद्राची उभारण्यात आले आहे. या आधुनिक इमारतीत एकूण ४९ गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, हे सर्व गाळे विविध महिला बचत गटांना खाद्य पदार्थ विक्री व व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या विक्री केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराद्वारे देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली देशातील पहिल्या गाळे ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रति गाळा १५,१०० ते ३२,००० रुपयांपर्यंत लिलाव दर नोंदविण्यात आले. एकूण ४९ गाळ्यांपैकी २ गाळे दिव्यांग महिला बचत गटांसाठी, १ गाळा तृतीयपंथी गटासाठी, १ गाळा कोविड योद्धा महिला गटासाठी, २ गाळे आदिवासी गटांसाठी, ३ गाळे दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत गटांसाठी आणि उर्वरित ४० गाळे पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी देण्यात आले.
सदर खाद्य पदार्थ केंद्राच्या सुशोभीकरण आणि ब्रँडिंगसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. डिझायनिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून इमारतीचे आकर्षक सुशोभीकरण केले. या खाद्य पदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे मराठी नाव देण्यात आले आहे. या केंद्रात पिंपरी चिंचवड शहराच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणारे तसेच महिलांसाठी कार्य केलेल्या समाजसुधारकांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
———–
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘सखी आंगण’ हा उपक्रम मोठी भूमिका बजावणार आहे. महिला बचत गटांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत करण्यात आला आहे. हा उपक्रम महिलांच्या विकासाच्या प्रवासात परिवर्तन घडवणारा ठरेल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
—–
आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्राला ‘सखी आंगण’ हे मराठी नाव देण्यात आले आहे. या केंद्राद्वारे महिलांना खाद्यपदार्थ, हस्तकला, घरगुती वस्तू आणि वस्त्रनिर्मिती यांसारख्या विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उपक्रमातून महिलांना स्थिर उत्पन्नाचे व्यासपीठ मिळून शहराच्या अर्थचक्रात त्यांचा सहभाग वाढेल. दरमहा १० लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित असून, यामुळे महिलांचे कौशल्य, व्यवस्थापन क्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल. हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
- ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
————-













































