पिंपरी, दि . १० ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘पीसीएमसी @ 50’ व्हिजन मोहिमेंतर्गत नागरिक सर्वेक्षणाची सुरुवात पिंपरी चिंचवड शहराच्या विविध विभागांमध्ये झाली आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या २५० हून अधिक प्रशिक्षित महिलांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. २०३२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. महापालिकेच्या या सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास धोरणासाठी जवळपास २० हजार नागरिकांचा फीडबॅक गोळा करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने सक्षमा उपक्रमा अंतर्गत ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचा सिटी ट्रान्सफॉर्मेशन उपक्रम (सीटीओ) सहकार्य करीत आहे. या सर्वेक्षणात निवासी व्यक्ती, व्यावसायिक आस्थापने आणि विविध संस्था येथील नागरिकांचा फीडबॅक गोळा केला जाणार आहे.
नागरिक या सर्वेक्षणात ऑनलाइन देखील सहभागी होऊ शकतात. महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांमध्ये आणि तसेच शहरातील विविध ठिकाणी याबाबत क्युआर कोड लावण्यात आले आहेत. हा कोड स्कॅन करून नागरिकांना सर्वेक्षणात ऑनलाइन सहभागी होता येईल. याशिवाय महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन सर्वेक्षणात सहभागी होता येईल.
पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्याला आकार देण्यासाठी ‘पीसीएमसी @ 50’ व्हिजन हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना सहकार्य करावे. तसेच सर्वेक्षण फॉर्म भरताना तुमचे योग्य मत नोंदवा. तुमचे मत आपल्या शहराच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.











































