पिंपरी चिंचवड मध्ये गुरुवारी निषेध महामोर्चाचे आयोजन

0
220

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपोषण स्थळी गेले. मनोज जरांगे पाटलांना त्यांनी 30 दिवसांचा वेळ मागितला होता. जरांगे पाटलांनी त्यांना मराठा आरक्षण देण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी 40 दिवसांचा वेळ दिला.

परंतु महाराष्ट्र सरकार आरक्षण देवू शकले नाही. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे झालेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ व आरक्षण मागणी पूर्ण व्हावी यासाठी आमरण उपोषण करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. या निष्क्रीय अकार्यक्षम फसव्या सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दि. 2 नोव्हेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चा सकाळी 11 वजता खंडोबा मंदीर चौक,आकुर्डी येथून तहसलिदार कार्यालय निगडी असा निघणार आहे.सदरचा मोर्चा आयोजनासाठी झालेल्या बैठकीस प्रकाश जाधव,मारुती भापकर,सतिश काळे,नकुल भोईर,धनाजी येळकर पाटील,राजन नायर,मीरा कदम, सुनिता शिंदे,कल्पना गिड्डे,अभिषेक म्हसे,गणेश सरकटे,दादासाहेब पाटील,अंगद जाधव,संजय जाधव,नानासाहेब वारे,पांडुरंग प्रचंडराव,वैभव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.