दि . २४ ( पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लोहगाव विमानतळावर सहा जणांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) ताब्यात दिले. बीएसएफ कडून विशेष विमानाने बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले.
मोहम्मद उस्मान अली शेख (४०), मोहम्मद अब्दुल्ला मुला शगरमुल्ला (२२), मोमीन हरून शेख (४०), जहांगीर बिल्ला मुल्ला (३५), मोहम्मद इलाहिन बिश्वास इलियाज बिश्वास (१९), तोहीद हसन मुस्लिम शेख (३१) अशी डिपोर्ट केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
सहा बांगलादेशी नागरिक भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ते भारतीय असल्याचे सांगितले. त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे आढळून आले. त्यांना २२ जुलै रोजी त्यांच्या मायदेशी रवाना करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून (सन २०१८) शहरातून प्रथमच अशा प्रकारे डिपोर्टींगची कारवाई करण्यात आली आहे. पुणे विमानतळावरून त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आले. तिथून पुढे बीएसएफच्या नियोजनानुसार त्यांना बांग्लादेशात पाठवण्यात आले.