पिंपरी चिंचवड भाजप संकल्पनामा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रसिद्ध

0
4

पिंपरी–चिंचवडला झेप घेण्यासाठीचा “संकल्पनामा”!

पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या घरांना मालमत्ता कर माफ करणार

पीएमपीएमएलच्या ताफ्यात चार हजार इलेक्ट्रिक बसेस येणार

पिंपरी, दि.१३- ‘विकसित भारता’चे स्वप्न साकारण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी गेली १२ वर्षे निरंतर दमदार वाटचाल करत आहेत . आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ‘विकसित महाराष्ट्रा’साठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच आम्हीही विकसित पिंपरी-चिंचवडचा संकल्प करून त्या दिशेने जातो आहोत. शहरांची महानगर बनतात, तशा त्याच्या प्रश्नांचे स्वरूप मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे होते अशावेळी केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असते. हे प्रयत्न झाल्यानेच पिंपरी–चिंचवडने झेप घेतली आहे. ही झेप आणखी उंचावण्यासाठी आम्ही संकल्प करत असल्याचा भाजपचा पिंपरी चिंचवड शहरासाठीचा संकल्पनामा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आणि पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत नवी सांगवी येथे प्रसिद्ध करण्यात आला.  

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 29, 31 आणि 32 येथील भाजपा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरासाठी पुढील पाच वर्षाचे नियोजन देणारा संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या “संकल्पनामा”मध्ये म्हटले आहे की, पिंपरी–चिंचवडचे महत्त्व लक्षात घेत या शहरात मेट्रो आली. मेट्रोमुळे या शहराचा दर्जा आणखी उंचावला. या शहरात इलेक्ट्रिक बसेस आल्या. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लागलाच आहे, पण त्याचबरोबर सामान्य माणसाचा प्रवास सुखद झाला आहे. पिंपरी–चिंचवडचे राज्यातील महानगरपालिकांतील मूल्यांकन दुसरे आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. रस्ते, दिवाबत्ती, कचरा, पाणीपुरवठा, आरोग्य, या मुलभूत नागरी सुविधांत अनेक सुधारणा करण्यात आल्या. तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विकास कौशल्य कार्यक्रम राबवले. महिला, कामगार, ज्येष्ठ नागरिक, तरुण, नोकरदार, उद्योजक, व्यापारी, या प्रत्येकाचे आयुष्य सुखकर करण्याच्या दृष्टीने भाजपाने कारभार केला आणि पुढील पाच वर्षेही याच मार्गाने आम्ही वाटचाल करू. देशाच्या विकासात पिंपरी–चिंचवडचे योगदान मोठे आहे, ते आणखी वाढेल, हा विश्वास संकल्पनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.

हा संकल्पनामा वास्तवाला धरून आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठबळावर निश्चित करण्यात आलेला आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विचार करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएची स्थापना केली. या दोन महानगरांचा आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील विकासाचे मोठे चित्र डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. यातून देशातील सर्वात अग्रगण्य महानगर हा आपला लौकिक आणखी भक्कम होणार आहे. 


मेट्रो विस्तारीकरण;  नद्यांमध्ये मेट्रो सुरू करण्याची व्यवहार्यता तपासणार

मेट्रो ही फक्त वाहतूकीची सोय नाही. ती माणसांच्या उत्पादकतेवरही परिणाम करणार आहे. पर्यावरणाचे संवर्धनही करणार आहे आणि शहराला जागतिक दर्जाही देणार आहे. मेट्रोचा चिंचवडपर्यंत आलेला मार्ग आता निगडीपर्यंत पोचेल आणि भक्तीशक्ती ते चाकण असा ४२ किलोमीटरचा मार्ग आपल्या सेवेत आम्ही आणणार आहोत.  कोचीच्या धर्तीवर पवना, मुळा, इंद्रायणी, या नद्यांमध्ये मेट्रो सुरू करण्याची व्यवहार्यता तपासणार आहे. 

चार वर्षात चार हजार  इलेक्ट्रिक बसेस येणार

पीएमपीएमएलच्या सेवेचा दर्जा आपण उंचावतो आहोत. पुढच्या काही महिन्यात बसेसच्या ताफ्यात आणखी एक हजार इलेक्ट्रिक बसेस येतील आणि पुढच्या चारवर्षात या ताफ्यात एकूण चार हजार बसेस येणार आहेत. यातून प्रवासी वाहतूक अधिक सुखद, अधिक सुरक्षित आणि पर्यावरणाची काळजी घेणारी असेल.

सुनियोजित वाहतुकीसाठी उपाययोजना

पुणे रिंगरोड वेगाने विकसित करून चिखली – मोई – निघोजे – खराबवाडी – मुकाई चौक – किवळे – सांगवडे – चांदखेड या महत्त्वाच्या फास्ट कनेक्टर लिंक विकसित करणार. नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाला गती देणार. देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूलासाठी पाठपुरावा करून पूर्णत्वास नेणार. भोसरी, चाकण, हिजंवडी इत्यादी औद्योगिक क्षेत्रांना रहिवासी भागाशी जोडणारे जलद कॉरिडॉर तयार करणार. शहरातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार. 

पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या घरांना मालमत्ता कर माफ करणार

पाचशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना मालमत्ता कर माफ करणार. अनधिकृत बांधकामांना आळा घालणार. रेडझोन हद्द कमी करून सुधारित विकास आराखडा तयार करणार. झोपडपट्टीवासियांना पक्की घरे देउन शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करणार. पिंपरी–चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने लागू केलेली लीज होल्ड नियमावली रद्द करून राहत्या नागरिकांची मालकी प्रस्थापित कऱण्यासाठी फ्रि होल्ड धोरण आणणार. घरांचे हस्तांतर शुल्क रद्द करणार

महत्वाचे

पिंपरी–चिंचवडमध्ये स्वतंत्र निबंधक कार्यालय सुरू करण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत.

२०४७ चे पिंपरी-चिंचवड डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा योजना राबवणार. 

पवना, मुळा, मुठा पुनरुज्जीवन प्रकल्पाला वेग देऊन पूर्ण करणार. 

नव्या एसटीपी प्रकल्पांमुळे नद्यांमध्ये सांडपाण्याचा एकही थेंब जाणार नाही आणि नदीचे जतन होईल आणि परिसंस्थाही बहरेल.

मोशी येथील आशियातील सर्वात मेठे एक्झिबिशन आणि कनव्हेनशन सेंटरच्या प्रकल्पाला गती देत असतांनाच जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर आणि डेटा सेंटर उभारून पिंपरी–चिंचवडची औद्योगिक शहराची ओळख आणखी विस्तारणार आहोत. 

कामगार वर्गही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्यासाठीच्या योजनांची काटेकोर अमलबजावणी होईल. तसेच त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
 
तीस वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा मोफत करण्यात येईल. 

 थेरगाव येथे कर्करोग रूग्णालयही उभारणार आहोत.  

पिंपरी–चिंचवडमध्ये ३३ टक्के हरीत क्षेत्र करण्यासाठी उपक्रम राबवणार आणि जागरूकताही वाढवणार. 

तळवडे येथे ७० एकर जागेत जैववैविध्यता उद्यान उभे करणार.

अलीकडे हवेच्या गुणवत्तेबद्दल खूप चर्चा होते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आजारांविषयी आम्ही अत्यंत जागरूक आहोत. या दृष्टीने बांधकामांची धूळ रोखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवले जाईल. इलेक्ट्रिक वाहनांना चालना दिली जाईल. औद्योगिक क्षेत्रात रिअल टाईम लक्ष ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.

शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यसाठीही कठोर धोरण स्वीकारण्याची आमचे धोरण राहील.
 
भटक्या प्राण्यांचा विशेषता कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांचे १०० टक्के लसीकरण आणि निर्बिजीकरण करणार.

टाटा समूहाचे या पट्ट्यातील औद्योगिक योगदान लक्षात घेता, ज्येष्ठ दिवंगत उद्योजक रतन टाटा यांचे स्मारक उभारण्याचाही आम्ही संकल्प केला आहे.

पिंपरी–चिंचवडच्या विकासासाठी समृद्धीसाठी, सुरक्षित आणि सुविधासंपन्नतेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, त्याचदृष्टीने आम्ही हा संकल्पनामा सादर करतो आहोत.