पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शत्रुघ्न उर्फ बापू काटे

0
79

– महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा पदाचा राजीनामा

पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : विधानसभा निवणुकिची धामधुम सुरू असतानाच भाजपमध्ये पिंपरी चिंचवड शहरात मोठी उलथापालाथ झाली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना आज वाजतगाजत चिंचवड विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीक़डे त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने जेष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची त्या पदाव नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबातचे नियुक्ती पत्र श्री. काटे यांना आज दिले.

भोसरी, पिंपरी आणि चिंचवड अशा तीनही विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली. जगताप हे स्वतः चिंचवडचे उमेदवार आहेत आणि त्यांना तिथेच लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे, त्यामुळे संघटनात्मक कामासाठी त्यांना वेळ देता येणार नाही. केवळ या कारणासाठी राजीनामा देत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि नंतर आमदार महेश लांडगे यांनी पक्षाची धुरा सांभाळली. दोन वर्षांपासून शंकर जगताप यांच्याकडे ही जबाबदारी पक्षाने सुपूर्द केली.

शत्रुघ्न काटे हे आपल्या विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत सलग तीन टर्म ते नगरसेवक आहेत. शहराचे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची वारंवार चर्चा होत होती. प्रत्यक्षात तिथे संधी मिळाली नाही म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवायला ते तयार होते. गेल्या वीस बावीस वर्षांपासून विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून ते समाजकारणात आहेत. स्थानिक भूमिपुत्र असून ते यशस्वी बांधकाम आणि हॅाटेल व्यावसायिक आहेत.
नम्र स्वभाव व सुसंस्कृत उच्च शिक्षित चेहरा अशी त्यांची प्रतिमा आहे.
काटे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बरोबरीने त्यांनी भाजप प्रवेश केला. भाजपचे शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे माजी खासदार अमर साबळे, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व शहरातील सर्व प्रमुख नेत्यांशी फोन वर चर्चा करून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शत्रुघ्न काटे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली.