पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायाच्या हद्दीत आणखी पाच पोलीस ठाण्यांची भर

0
2

पिंपरी, दि. ५ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायाच्या हद्दीत आणखी पाच पोलीस ठाण्यांची भर पडणार आहे. पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगाव पोलीस ठाण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे येत्या काळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या २५ वरून ३० होणार आहे.

पोलीस आयुक्त चौबे यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा पोलीस आयुक्तालयात १७ पोलीस ठाणी, चार पोलीस विभाग, दोन परिमंडळ होते. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यासह २५ पोलीस ठाणी, आठ पोलीस विभाग, चार परिमंडळ केले. एक स्वतंत्र अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, वाहतूक शाखा, सायबर, आर्थिक गुन्हे शाखा, परिमंडळ तीन व गुन्हे शाखा यांच्यासाठी स्वतंत्र पाच पोलीस उपायुक्त आणि दहा सहायक पोलीस आयुक्त पदेही निर्माण केली.

बावधन, हिंजवडी, सांगवी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली आणि देहूरोड या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून आयुक्तालयामध्ये नव्याने पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी व देहूगाव अशी पाच पोलीस ठाणी निर्माण करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या परिमंडळ चारकरिता पोलीस उपायुक्त आणि इतर पदे मंजूर नसल्याने त्यासाठीचाही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महासंचालक कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावात एक पोलीस उपायुक्त, २० पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ८० पोलीस उपनिरीक्षक, ८२० पोलीस कर्मचारी आणि १० सफाई कामगार अशा पदांची मागणी केली आहे.

पोलीस ठाणे – मागणी केलेली पदे

परिमंडळ चार – ११

पिरंगुट – १९०

जांबे – १८९

पिंपळे सौदागर – १८३

मोशी – १९४

देहूगाव – १९४

एकूण – ९६१

आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने पाच पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलीस ठाण्यांमुळे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होणार आहे, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.