पिंपरी चिंचवड : देशाच्या आर्थिक विकासात महत्व अधोरेखित करणारे शहर – आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह

0
378

पिंपरी , दि. ११ (पीसीबी)- : पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आले असले तरी हे केवळ उद्योगनगर नसून महान संतश्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमि, क्रांतिवीर चापेकर यांची जन्मभूमी असलेले हे नगर, महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान म्हणून नावारुपास आलेले शहर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी क्रांतिकारक ऐतिहासिक पार्श्र्वभूमी या शहराला लाभलेली आहे. पुण्याचे जुळे शहर म्हणून पिंपरी चिंचवड कडे पाहिले जाते. मात्र, गेल्या चार दशकांपासून टेल्को, बजाज, महिंद्रा, एसकेएफ, टीसीएस अशा अनेक कंपन्यांची भर पडल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी देखील देशाच्या आर्थिक प्रगतीत पिंपरी चिंचवड शहराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरे सांगायचे तर, पिंपरी चिंचवड हे एक गतिमान शहर आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याची अफाट क्षमता असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज ४१ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे, ‘कटिबध्दा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य घेऊन पिंपरी चिंचवड नगरीला भारतातील सर्वात स्वच्छ व हरित शहर बनवून जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त करण्यासाठीचा प्रवास सुरू झाला आहे. यानिमित्त, शहरातील विकास आणि महानगरपालिकेने आजपर्यंत राबविलेलल्या धोरणाचा हा लेखनप्रपंच आपणासमोर मांडत आहे.

उद्योग आणि संधीचे केंद्र म्हणून या “उद्योगनगरी” कडे पाहिले जाते. उद्योग – व्यवसाय उभारणीसाठी कुशल कर्मचारी वर्ग, गुंतवणूकदारांसाठी हे शहर अनुकूल आहे. येथे असलेले वैविध्यपूर्ण औद्योगिक क्षेत्र, भरभराट होत असलेले उत्पादन क्षेत्र, आर्थिक स्थिरता व त्याच्या वाढीसाठी मजबूत पाया पिंपरी चिंचवडने रोवला आहे. चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण एमआयडीसीचा काही भाग जोडून जवळपास ७ हजारहून अधिक छोटे-मोठया उद्योगांकडून उत्पादन निर्मिती आणि सेवा देण्याचे काम या औद्योगिक परिसरात सूरू आहे. शहराची प्रगती निरंतर ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मुलभुत नागरी सुविधांवर महानगरपालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे. मेट्रो रेल्वे, रस्ते वाहतूक, बीआरटीएस मार्गांचे जाळे पसरवून शहराच्या टोकांना जोडण्याचे काम करण्यात आले आहे. तरुणांना सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांच्या रोजगारासाठी पायाभूत सुविधा, अचूक शहरी नियोजन आणि कौशल्य विकास उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरीता महानगरपालिका सक्षमपणे आपली भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उद्योजकतेला पोषक वातावरण निर्मिती तसेच तरूणांचे स्वप्न बहरण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरीता महानगरपालिका नेहमीच पुढाकार घेत आहे. यातून शहर आणि संपूर्ण राष्ट्र या दोघांचेही उज्वल भविष्य घडेल, असे उद्दिष्टये डोळयासमोर ठेवून शहर विकासाचे लक्ष्य गाठण्याचा आमचा मानस आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच नागरिक केंद्री उपक्रम राबविण्यावर भर देते. महानगरपालिकेचे स्वत:च्या मालकीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. वैद्यकीय सेवेचे आधुनिकीकरण करुन वायसीएम रुग्णालयासह मेडीकल कॉलेज, थेरगाव कॅन्सर हॉस्पीटल, १०० बेडचे नवीन भोसरी रुग्णालय, १२० बेडचे सुसज्ज जिजामाता रुग्णालय, आकुर्डी येथील १३० बेडचे कै. प्रभाकर कुटे रुग्णालय, जिजाऊ क्लिनिक, मासुळकर कॉलनी येथील समर्पित नेत्र रुग्णालय, डायलेसिस केंद्र यासह ओपीडी मार्फत २४ x ७ अशी आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सक्षमपणे उभे आहोत. स्त्री-रोग विभाग, मानसोपचार, त्वचारोग, क्षयरोग विभाग, रेडिओलॉजी, मेडिसीन, पॅथोलॉजी लॅब यासारख्या सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध असून तज्ञ डॉक्टर टीम येथे कार्यरत आहेत. महापालिका रुग्णालयांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत असुन विविध आजारांच्या उपचारांसाठी निरंतरपणे अद्यावत सुविधा करण्याचा उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे.

नागरिकांना घराजवळ प्राथमिक उपचार मिळावेत, या उददेशाने २५ ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सूरू करून कुठल्याही गंभीर आजाराचे निदान व उपचार होण्यासाठी २४ x ७ महापालिका रुग्णालये कटीबध्द आहेत. यासह जन्म-मृत्यू दाखले त्वरित उपलब्ध होतात. शाळांचे सक्षमीकरणासाठी शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृध्दी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण,“जल्लोष शिक्षणाचा”, सामान्य ज्ञान स्पर्धा, केंद्र भेटी, हस्ताक्षर स्पर्धा, अद्ययावत खेळांचे प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात येत आहे. मनपामार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सूरू करण्याचे धोरण आखण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मनपा सोबत आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया, डोअर स्टेप इ. संस्था गुणवत्ता वाढीसाठी काम करीत आहेत. याचाच परिपाक म्हणून बोपखेल मनपा शाळा व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सूरू असलेली इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या दहा शाळांच्या क्रमांकामध्ये समाविष्ट असणारी भारतातील एकमेव शाळा नावारुपाला आली आहे. सीबीएससी इंग्रजी बारावी पर्यंतचे शिक्षण व सोबत महाराष्ट्रातील विविध संतांच्या विचारांचा अभ्यासक्रम असणारा अत्याधुनिक ज्ञान व भक्ति, संस्कार देण्यासाठीचा टाळगाव चिखली येथील “संतपीठ” हा एक अभिनव उपक्रम महापालिका राबवित आहे. क्रीडानगरी म्हणून शहराने स्वतःचे नाव निर्माण केले आहे. विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होण्यासाठी शहरात अद्यावत क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. सायन्स पार्क, तारांगण अशा प्रकल्पांमुळे शहर विज्ञानाकडे झेप घेत आहे. शहरातील नागरिकांना ‘पीसीएमसीस्मार्ट सारथी’ अॅपच्या साहाय्याने पाणी, वाहतूक, आपत्कालीन परिस्थिती या संबंधीची तातडीची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे महापालिकेशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’द्वारे तक्रार नोंदविता येते, तसेच मनपाची विविध देयके/ कर भरणा करता येतो. त्याचप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्र, दाखले इत्यादींची मागणी नोंदविणे सोपे झाले आहे. दैनंदिनी ५० हजारहून अधिक नागरिक या ऍपचा वापर करून सुविधांचा लाभ घेत आहेत. गृहप्रकल्प, तृतीय पंथीय समूहासाठी विविध उपक्रम, नवी दिशा उपक्रम, औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर.), उद्योग कक्ष, कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण बदल, उत्पादनभिमुख प्रशिक्षण योजना, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र, कै. अटल बिहारी वाजपेयी उद्यान, ८ टू ८० पार्क, बर्ड व्हॅली, इको ट्रॅक, फूड कोर्ट विकसीत करणे, ऍनिमल शेल्टर हाऊस, ईव्ही वाहने व चार्जिंग स्टेशन्स, रुफटॉप सोलर पॉवर प्रोजेक्ट, कर विभागाचे आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र, रोईंग प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, हॉर्स रायडिंग, धनुर्विद्या, बॅडमिंटन हॉल, कबडडी प्रशिक्षण अकादमी, वेस्ट टू बेस्ट या सारखे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प कार्यरत आहेत.

पर्यावरण संतूलन व शाश्वत विकासाचे महत्त्व लक्षात घेवून ‘ग्रीन बिल्डिंग’ या सारख्या उपक्रमांना चालना देण्याचे काम सूरू आहे. शहर आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल ठेवण्यासाठी हा प्रयोग राबविला जात आहे. शहरातील वायू प्रदूषण, इंधन वापराचे प्रमाण कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पूरक असणाऱ्या ध्येय-धोरणांना चालना देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरातील ईव्ही इकोसिस्टम सुधारण्यासाठी ईव्ही रेडिनेस आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये ईव्ही चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन विकसित करणे, ईव्ही घटकांचे उत्पादन आणि सार्वजनिक वाहतूक विद्युतीकरण यासारख्या सुविधांचा समावेश आहे. २०२६ पर्यंत शहरात १, ८०,००० ईव्ही वाहनांचा वापर तसेच तीन चाकी प्रवाशी वाहनांमध्ये किमान ५० टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत, यासाठी महापालिकेने लक्ष्य केंद्रीत केले आहे. सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल शक्य तितका सुलभ आणि किफायतशीर तसेच इलेक्ट्रिक ऑटोरिक्षांचा अवलंब होण्यासाठी समस्यांवर तोडगा काढला जात आहे. शहरात दररोज १२०० टन पेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कच-यातून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होत असतो. यामुळे हवा प्रदूषित होण्याची शक्यता जास्त संभावते. मात्र, महानगरपालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाने कचरा डेपोवर बायोमायनिंग आणि कॅपिंग केले आहे. त्यामुळे हवेचे मानांकन चांगले राहिले आहे. शहरात हरित सेतू, वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट पासून बायोगॅस, वेस्ट टू कंपोस्ट, ईव्ही पॉलीसी सारखे महत्वाचे प्रकल्प महानगरपालिकेने राबविले आहेत. यामुळे शहरातील हवामान उच्च दर्जाचे ठेवण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ अर्बन अफेअर्सने “स्टेट ऑफ सिटीज”: टुवर्डस लो कार्बन अँड रेसिलियंट पाथवेज अहवालानुसार पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्र राज्यातील ४८ टक्के ग्रीन कव्हर असलेले एकमेव शहर ठरले आहे. हवामान स्मार्ट सिटी मूल्यांकन आराखडा २.० अंतर्गत हवामान अनुकुलीत ठेवून केलेल्या उत्तम कामगिरीसाठी महानगरपालिकेला ५ पैकी ४ स्टार मानांकर प्राप्त झाले आहे. शहरातील हवामान अनुकूलनासाठी भविष्यातील आव्हाने आणि त्यासाठीच्या उपाययोजना तसेच अभियांत्रिकी, वाहन उद्योग, औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान उद्योगांचा समावेश असलेल्या औद्योगिक क्षेत्रांनी हवामान लवचिकता कृती आराखडा प्रभावीपणे तयार करून त्याचा अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. ‘ग्रीन स्कूल – झिरो वेस्ट’, सोसायटीत कंपोस्टिंग यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प इ. उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या मुख्य अनुकूलन उपायांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, जल व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, शहरी जैवविविधता, कच-यातून ऊर्जा निर्मिती, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकाची स्थापना, इमारतींच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प, हरित इमारती, नदी सुधार प्रकल्प, पाण्याचा पुर्नवापर, एसटीपी प्लॉन्ट, वृक्षारोपण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग अशा प्रकल्पांमुळे भविष्यामध्ये हवामानात चांगले बदल दिसून येतील हे नक्की.

खरे तर, महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांशी संवाद प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. हे प्रशासकीय विभाग आणि नागरिक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. या उपक्रमाद्वारे, थेट नागरिकांकडून सल्ला, उपाय, अभिप्राय आणि सूचना प्राप्त होतात. यातून नागरिकांच्या गरजा, चिंता आणि आकांक्षा अधिक व्यापकपणे समजून घेण्यास मदत होते. निर्णय प्रक्रियेत नागरिकांना सामील करून घेता येते. प्रशासनाने हाती घेतलेले प्रकल्प आणि उपक्रम त्यांच्या प्राधान्यक्रमांशी जुळतात का? हे पाहणे सोयीचे होते. यातून प्रशासकीय कामाची परिणामकारकता वाढते आणि समाजाशी असलेली आपलेपणाची भावना निर्माण होते. या परस्पर संवादादरम्यान मिळालेला अभिप्राय आम्हाला आमची पुढील रणनीती आखण्यात, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास तसेच कोणत्याही संभाव्य आव्हानांना अधिक तयारीने सामोरे जाण्यास मदत होते. शेवटी, नागरिकांशी संवाद साधण्याची क्रिया महानगरपालिकेच्या अंतर्गत विकासासाठी अधिक समावेशक, प्रतिसादात्मक आणि नागरिक-केंद्रित दृष्टीकोन निर्माण करण्यास उपयुक्त ठरत असते.

सध्या, शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेता पवना धरणातून आलेल्या पाण्यावर रावेत येथे जल उपसा केंद्राच्या माध्यमातून सेक्टर २३ जल शुध्दीकरण प्रकल्पात पाणी शुध्द केले जाते. शिवाय, भामा आसखेड धरणातून १०० एमएलडी पाणी उचलून चिखली येथील जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत आणून तेथून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो. या प्रकल्पाची क्षमता २०० एमएलडी आहे. शहराच्या विस्तारामुळे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या तीन वर्षांत भामा आसखेड धरणाच्या पाण्याची उपलब्धता पाणी नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भामा आसखेड धरणातून सातत्यपूर्ण पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संवाद साधत आहोत. यातून पिंपरी चिंचवडच्या वाढत्या पाण्याची गरज भागवण्यास हातभार लागेल. पाणी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचे नियोजन करून पाण्याचे स्त्रोत शोधून महानगरपालिकेकडून उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच नदी स्वच्छतेवर भर देवून नद्या दुषित होणार नाही, याची काळजी महापालिकेकडून घेतली जात आहे. याशिवाय, रखडलेल्या पवना धरणाच्या बंद पाण्याच्या पाइपलाइन प्रकल्पाच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहोत. कोणत्याहीआव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणि पवना धरण पाइपलाइन प्रकल्प जलद पूर्णकरण्यासाठी भागधारकांशी सहकार्य करत आहोत. हा प्रकल्प केवळ आपली पाणी वितरण क्षमताच वाढवणार नाही, तर शहराच्या भविष्यातील पाण्याच्या गरजांसाठी उत्तम जलव्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी योगदान देईल.

पिंपरी-चिंचवड शहरात माझी वसुंधरा अभियान,स्वच्छ महाराष्ट्र, अमृत, स्मार्ट सिटी, शून्य कचरा अभियान, स्वच्छ हवा अभियान हे महत्त्वाचे उपक्रम प्रगतीपथावर आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत, पाणी व्यवस्थापन आणि पाण्याचा वापर योग्य करण्यासाठी त्यावर काम करत आहोत. स्वच्छ महाराष्ट्र आणि शून्य कचरा अभियानाचा उद्देश स्वच्छता आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनाला चालना देणे हा आहे. या उपक्रमांद्वारे आम्ही कचऱ्याचे विलगीकरण, योग्य विल्हेवाट लावण्याच्या पद्धती आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देत आहोत. अमृत आणि स्मार्ट सिटी उपक्रम, सुधारित पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करून शहरी विकासाला चालना देत आहेत.

अत्यावश्यक शहरी सेवा, गतिमानता आणि रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांसाठी गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय स्वच्छ हवा अभियान, प्रदूषण कमीकरणार्‍या आणि स्वच्छ हवेला प्रोत्साहन देणार्‍या उपाय योजनांद्वारे हवेच्या गुणवत्तेची चिंता दूर होत आहे. या सामूहिक प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांसाठी एक शाश्वत, राहण्यायोग्य आणि प्रगतीशील शहर निर्माण करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि डिस्प्ले बोर्ड, स्मार्ट ट्रॅफीक, स्मार्ट पार्कीग, सिटी नेटवर्कच्या माध्यमातून Integrated command & control Centre (ICCC) ला जोडण्यासाठी एकूण ६००किमी अंतराचे Optical fiber Network व सतराशे पोल्सचे जाळे टाकण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनीस उत्पन्न मिळेल. तसेच वारंवार होणा-या गैरसोयीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. ही पायाभूत सुविधा खूप मोठी असून डक्ट आणि केबल्सद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीसाठी महसूल मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. जी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या कार्यपध्दती गतिमान होण्यासाठी ३५ हून अधिक आयटी अॅप्लिकेशन्स एकात्मिक पद्धतीने विकसित केले असून हे मॉड्यूल ४० हून अधिक महापालिकेतील विभागांमध्ये लागू होईल. या प्रकल्पांतर्गत, महानगरपालिकेच्या १००० हून अधिक प्रक्रियांवर व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात आली आहे. मिळकतीचे सर्वेक्षण एटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत करण्यात आला आहे. ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, जीआयएसची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडली जाणार आहे. जेणेकरून PCMC चा जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येईल. तसेच, एंटरप्राइझ-वाइड रिसोर्स प्लॅनिंग दृष्टीकोनद्वारे महानगरपालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा (डेटा) सर्वात चांगल्या प्रकारे वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाने अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमण इत्यादी शोधून त्यानुसार योग्य नियोजन किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. जीआयएस, ईआरपी आणि वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहेत. संपूर्ण शहरासाठी लायडर (LiDAR) सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाद्वारे १० सेंटीमीटर एवढी लहान वस्तू देखील अचूकतेने सहजपणे मोजली जाऊ शकते. झोपडपट्ट्यांमध्ये बॅकपॅकच्या साहाय्याने LiDAR सर्वेक्षण केले जात आहे. त्याद्वारे संपूर्ण शहर ३६०-डिग्रीमध्ये टिपले गेले आहे. उत्तम प्रशासनासाठी LiDAR डेटा आणि GIS बेस मॅपसह एकत्रित केला जाणार आहे. हा डेटा मालमत्ता कर डेटाबेससह एकत्रित करून अधिकार्‍यांकडून मालमत्तांना प्रत्यक्ष भेट न देताही पडताळणी केली जाऊ शकते. GIS डेटाबेसमध्ये ३००+ GIS स्तर आहेत. ज्यात पाईप लाईन, ड्रेनेज लाईन इत्यादी भूमिगत उपयुक्ततेचे संपूर्ण नेटवर्क आहे. यामध्ये शहराचे दृश्य 3D प्रतिमेमध्ये दाखविण्यात येईल. शहराच्या भू-भागाचा अभ्यास करण्यासाठी आणि पाणी तुंबण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी शहराचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल (DEM) तयार करण्यातही ते मदत करेल. सद्य:स्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात सहा लाख हून अधिक मालमत्तांचे घरोघरी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जीआयएस (GIS) सक्षम एकात्मिक (ERP) प्रकल्प भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिका सर्व विभाग जीआयएस (GIS) वातावरणात इआरपी द्वारे जोडले जातील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) च्या मदतीने तरूणांना उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीसाठी आवश्यक कौशल्ये देण्यासाठी एक व्यापक योजना आखली आहे. विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राचे नियमित मूल्यांकन आणि विश्लेषण केले जाते. उद्योगांच्या मागणीनुसार उदयोन्मुख कोणती कौशल्ये गरजेचे आहेत ते ओळखण्यास आणि त्यानुसार आमचे प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा तयार करण्यास मदत करते. तरूण पदवीधर ते नोकरीसाठी तयार आहेत, याची खात्री करून, उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग तज्ञांशी संवाद साधत आहोत. लाईट हाऊससारखे उपक्रम युवकांना उपयुक्त ठरत आहेत. उद्योग आणि व्यावसायिक तज्ञांच्याभागीदारीद्वारे अनुभव, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षण सेवा सूलभ करीत आहोत. हे उपाय तरुणांची रोजगार क्षमता वाढवते, त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यास तयार करते. याशिवाय, विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योजकता मॉडेल समाविष्ट करून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येते. हे पदवीधरांना स्वयंरोजगारांच्या संधी शोधण्यासाठी उपयुक्त ठरून आर्थिक सुबत्ता व स्वयंपूर्णतेमध्ये योगदान देते. उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी प्रभावीपणे योगदान देऊ शकतील. तरुणांना अर्थपूर्ण आणि शाश्वत करिअरचे मार्ग उपलब्ध करतील अशा महापालिकेच्या प्रशिक्षण योजना आहेत. तांत्रिक आणि उद्योगाच्या गरजांनुसार सातत्याने जुळवून घेत महानगरपालिका एक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळालेले पुरस्कार :-
१) स्वच्छ सर्वेक्षण २०२२ पुरस्काराने सन्मान
२) इंदौर येथे भारत सरकारचा “गव्हर्नन्स” पुरस्कार
३) सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशन (ग्वांगझू अवॉर्ड)च्या १५ अंतिम शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहराचा समावेश
४) प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत २०२१-२२ चा “राजीव गांधी प्रशासकी गतिमानता पुरस्कार”
५) पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा “एईएसए बहिरे राठी” पुरस्काराने गौरव
६) स्मार्ट सिटी मिशन अंतर्गंत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला सन २०२२ चा “ई-गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्कार.
७) “स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण” या स्पर्धेत “ओपन डेटा विक” पुरस्कार, ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतीशीलता आणि हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींमध्ये उत्तम कामगीरी बजावल्याबददल “क्लायमेट चेंज” पुरस्कार.
८) प्लेस मेकिंग मॅरेथॉनमध्ये ८ टू ८० पार्कला विजेतेपद, शहरी ई-प्रशासन निर्देशांक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, द स्ट्रीटस फॉर पीपल चॅलेंज स्पर्धेत देशात सन्मान.
९) इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन करीत १ कोटीचे बक्षीस.
१०) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला डेटा असेसमेंट मॅच्युरिटी फ्रेमवर्ककरिता स्मार्ट सिटी अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर दुस-या क्रमांकाने सन्मान.
११) क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्कसाठी ४ स्टार रेटींग.
१२) पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला ‘युनिफाईड कम्युनिकेशन’ या श्रेणीत “डिजिटल टेन्कोलॉजी सभा २०२१”चा पुरस्कार.
१३) उत्कृष्ठ कामकाजासाठी महापौर परिषदेतर्फे ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
१४) देशपातळीवर “स्मार्ट एनर्जी, नागरी सहभाग आणि मोस्ट पॉप्युलर लीडरशिप” पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान
१५) सुरत येथे ‘ओपन डेटा वीक, क्लायमेट चेंज, प्लेस मेकींग उपक्रमांतर्गत तीन विविध पुरस्कारांनी सन्मान

कोट…
शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणाऱ्या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवले. पिंपरी चिंचवड शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनवले. शहरातील लोकप्रतिनिधी, कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची औद्योगिक पिंपरी चिंचवड नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनविणा-या या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन मी सर्वांचे आभार मानत आहे.
शहर विकासासाठी पर्यावरण समतोल आणि नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे, स्मार्ट पायाभूत सुविधा, कार्यक्षम वाहतूक, सुलभ नागरी सुविधांना प्रोत्साहन देणाऱ्या नाविन्यपूर्ण शहरी नियोजन धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. शहराचे विस्तारीकरण लक्षात घेता पायाभुत सुविधांचा विचार करून पुढील ५० वर्षाचे अचूक नियोजन आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिकेचा आराखडा तयार करण्यावर भर असेल. लोकप्रतिनिधी, लोक भावनांचा विचार केला जाईल. येणा-या पिढीचा शहरात श्वास गुदमरणार नाही, याची काळजी घेवून लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक, उद्योजक, विकसक, कष्टकरी यांचा देखील विचार केला जाईल. दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही याकडे लक्ष दिले जाईल. क्रीडा क्षेत्रातही पिंपरी चिंचवड भरीव कामगीरी करीत आहे. नागरिकांच्या सहभागातून आणि पारदर्शक कारभारातून सामाजिक बांधिलकीची भावना मजबूत करून शहराच्या विकासात नागरिकांना भागीदार बनवणे हे आमचे ध्येय आहे. नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा उपयोगकरत राहू. पर्यावरणास अनुकूल असलेल्या पद्धती स्वीकारून भविष्यातील शहर हे तंत्रज्ञानाची कास धरणारे, कार्यक्षम सेवा देणारे, डेटा आधारित काम करणारे आणि शहराचा विकासाचा आलेख उंचावणारे असेल. महिलाबचत गटांच्या माध्यमातून सक्षमपणे व्यवसाय आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्याकडे आम्ही भर दिला असून विविध योजनांची आखणी त्यासाठी केली जात आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी यांच्या साठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. समाजातील सर्व घटकांचे सक्षमीकरण करणे हा यामागचा उद्देश आहे. एक प्रशासक या नात्याने भविष्यातील पिंपरी चिंचवड शहर हे एक गतिमान, शाश्वत आणि भरभराटीचे शहरी केंद्र पाहायला मला आवडेल. शहरवासीयांचा यामध्ये निश्चितपणे सहभाग आणि सहकार्य मिळेल, असा मला ठाम विश्वास आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्धापदिनानिमित्त शहरवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.