पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाकडून उमेश चव्हाण यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

0
3

पिंपरी, दि .२४ रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाने ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. रुग्णांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याला जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माजी आमदार विलास लांडे आणि महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार उलपे उपस्थित होते.

उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषदेमार्फत सरकारी रुग्णालयातील सुविधा, औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय दुर्घटनांविरोधात आंदोलने केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना न्याय मिळाला. अभिनेते सुनील गोडबोले यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उमेश चव्हाण रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून कलाकारांना नेहमीच मदत करीत आहेत, असे मेघराज राजे भोसले सांगितले. चव्हाण यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
विजयकुमार उलपे यांनी मान्यवरांच्या हस्ते चव्हाण यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र, गौरवचिन्ह देऊन गौरवले. कार्यक्रमात गायक अमर पुणेकर, चित्रसेन भवार, गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, नर्तिका मृणाल कुलकर्णी, गायक राहुल शिंदे, मुराद काझी आणि संगीतकार साजन विशाल यांनी कला सादरीकरण केले. अमर पुणेकर यांच्या गाण्याने वातावरण उत्साहपूर्ण झाले, तर चित्रसेन भवार यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंग चढला. मृणाल कुलकर्णी यांच्या नृत्याने आणि साजन विशाल यांच्या गायन संगीताने कार्यक्रमाला चार चाँद लागले.

   रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले, "हा सन्मान माझा नाही, तर रुग्ण हक्क परिषदेच्या प्रत्येक सदस्याचा आहे. रुग्णांच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरू राहील. समाजात बदल घडवण्यासाठी सर्वांनीच हातभार लावला पाहिजे. मी पिंपरी चिंचवड कलाकार महासंघाचा आभारी आहे."