पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करा – तुषार हिंगे

0
6
  • माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. 20 पीसीबी – पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहे. शहरातील औद्योगिक, रहिवाशी आणि व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली आहे. शहरातील नागरिकांना वारंवार उद्धभवणार्‍या वीजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महावितरण कंपनीचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्यास यावे, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंंगे यांनी केली आहे. यासंदर्भात यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

तुषार हिंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन होऊन 42 वर्षे झाली आहेत. शहरातील सुखसोई लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहर चारी बाजूने झपाट्याने वाढत आहे. शहरात गगनचुंबी मोठे गृहप्रकल्प उभे झाले आहेत.

शहरात महावितरण कंपनीचे पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग कार्यरत आहेत. शहरातील औद्योगिक, रहिवाशी, व्यावसायिक अशा वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली आहे. परिणामी, शहरात वीजेसंदर्भातील अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जात नसल्याने वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील औद्योगिक पट्ट्यातही वारंवार वीज खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पावसाळ्यात या प्रकारच्या समस्येत आणखी भर पडते.

शहरातील नागरिकांना वारंवार उद्धभवणार्‍या वीजेसंदर्भातील समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड रहिवाशांसाठी महावितरण कंपनीचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्यात यावे. जेणेकरून शहरातील नागरिकांना चांगली आणि दर्जेदार वीजपुरवठा सेवा उपलब्ध होईल. महावितरण कंपनीच्या स्वतंत्र कार्यप्रणालीमुळे नागरिकांच्या समस्येचे निराकरण होईल. येणार्‍या काळात शहराच्या वाढत्या विकासासाठी हे कार्यालय अत्यावश्यक आहे, असे तुषार हिंगे यांनी निवेदनात म्हटले आहे.