पिंपरी चिंचवडला सहावा आमदार मिळणार?

0
14
  • सचिन पटवर्धन, अमोल थोरात, नाना काटे विधानपरिषद उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक

  • पिंपरी, दि. ११ {पीसीबी} – राजकीय समतोल राखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराला सहावा आमदार मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून येत्या २७ मार्च रोजी मतदान आहे. विरोधकांकडे म्हणजेच महाविकास आघाडीच्या तीनही घटकपक्षांचे मिळून फक्त ४६ आमदार असल्याने महायुतीलाच या सर्व जागा मिळणार असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
    विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या. महायुतीमधील भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची १ अशा जागा आहेत.
    पिंपरी चिंचवड शहरात विधानसभेसाठी भोसरीचे महेश लांडगे, चिंचवडचे शंकर जगताप तसेच विधान परिषदेसाठी उमा खापरे आणि अमित गोरखे असे भाजपचे चार आमदार आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी राखीव मतदारसंघाचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदेंच्या शिवसेनेचे तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करतात.
    आगामी महापालिका निवडणुकित अजितदादांच्या राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता पाहिजे आहे. पक्षाला ताकद मिळावी म्हणून आता विधान परिषदेवर संधी द्यावी म्हणून शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष नाना काटे हे दोघे तीव्र इच्छुक आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचे नावसुध्दा चर्चेत आहे. आजवर भाजपने शहरात राज्यसभा खासदार, तीन महामंडळांचे अध्यक्ष, दोन विधान परिषद आमदार दिले आणि त्या तुलनेत २० वर्षे महापालिकेत कार्यकर्त्यांनी निर्विवाद सत्ता देऊनही अजित पवार यांनी एकही पद दिलेले नाही.

भाजपकडे उमा खापरे आणि अमित गोरखे हे दोन परिषदेचे आमदार कार्यरत आहेत. दोन वेळा राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद मिळालेले जेष्ठ नेते सचिन पटवर्धन तसेच शहराचे माजी सरचिटणीस अमोल थोरात हे दोघे संधी मिळावी म्हणून मुंबईत तळ ठोकून आहेत.