पिंपरी-चिंचवडमध्ये 15 जुलैपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवडा

0
223

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – अतिसार हा सुयोग्य व वेळेत उपचार केल्यास निश्‍चित आटोक्‍यात येऊ शकतो. अतिसार रुग्णांचे उपचार आणि दक्षता याबाबत जनजागृती व्हावी यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरात 15 जुलै  पर्यंत  विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे मृत्यूचे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. अतिसारामुळे होणारे मृत्यू हे टाळता येणारे असून क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंकच्या वापरामुळे हे शक्‍य होते. क्षारसंजीवनी (ओआरएस) झिंक सर्व महापालिका रुग्णालय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे.

या कालावधीत नागरिकांमध्ये अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणे, दवाखाना रुग्णालयात ओ. आर. एस. झिंक कॉर्नरची स्थापना करणे, शहरातील झोपडपट्टी, स्थलांतरीत भटके, बांधकाम मजूर यासारख्या भागात आशा स्वयंसेविकांमार्फत पाच वर्षाखालील मुले असलेल्या कुटुंबांना ओ. आर. एस. झिंकचे वाटप करणे, त्याचबरोबर स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील झोपडपट्टी भागात आशा स्वयंसेविका पाच वर्षाखालील बालक असलेल्या घरास भेट देत आहेत. ओआरएस पाकीट मातेकडे देणार आहेत. पालकांनी वैयक्तीक तसेच परिसर स्वच्छता राखावी. बाळाला भरवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वच्छ निर्जंतुक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. ताजे व स्वच्छतापूर्वक बनविलेले अन्न बालकास द्यावे.

अंगणवाडी, शाळा, झोपडपट्टी भागात घरोघरी येणाऱ्या आशा आरोग्य कर्मचारी स्वच्छतेचे महत्व, ओआरएस मिश्रण होत धुण्याचे कौशल्य याबाबत माहिती देणार असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे ध्येय साध्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.