पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. आगार उभारण्याची आमदार शंकर जगताप यांची मागणी

0
7

पिंपरी, दि.५ ( पीसीबी ) – शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड-रावेत परिसरात नवीन एस.टी. बस आगार उभारण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे त्यांनी यासंदर्भात पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

आमदार जगताप यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण भागातील मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि आय.टी. अभियंते हिंजवडी, वाकड, रावेत, पिंपळे सौदागर, पुनावळे आदी भागांत वास्तव्यास आहेत. या नागरिकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी पुणे किंवा वल्लभनगर एस.टी. स्थानकावर जावे लागते, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.

वाकड-रावेत परिसरात नवीन बस आगाराची गरज

या परिस्थितीचा विचार करून, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) ताब्यातील वाकड-रावेत परिसरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त एस.टी. बस आगार उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा आगारामुळे प्रवाशांना सहजपणे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सोयीसुविधा मिळतील, तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.

वल्लभनगर एस.टी. स्थानकाच्या दर्जावाढीची मागणी

वल्लभनगर एस.टी. स्थानकातून राज्यातील आणि बाहेरील अनेक बसेस सुटतात, मात्र प्रवाशांना बसच्या वेळापत्रकाची अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे या स्थानकातील लांब पल्ल्याच्या बसेसचे सविस्तर वेळापत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच स्थानकातील मंजूर पदे आणि प्रत्यक्ष कार्यरत असलेले कर्मचारी यांची माहिती मिळावी आणि भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थानकाच्या दर्जावाढीबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले आहे.

यासंदर्भात परिवहन विभागाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, जेणेकरून प्रवासी आणि कर्मचारी यांना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतील, अशी अपेक्षा आमदार जगताप यांनी व्यक्त केली आहे.