पिंपरी-चिंचवडमध्ये तीन महिन्यानंतर कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू

0
174

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात तीन महिन्यानंतर कोरोनामुळे एका महिलेचा आज (गुरुवारी) मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे शेवटचा मृत्यू मार्च महिन्यात झाला होता.

भोसरीतील 35 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ही महिला 4 जुलै रोजी महापालिका रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान आज या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला कोरोनासह दुसरे आजारही होते. तीन महिन्यानंतर कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. पहिल्या लाटेत वयोवृद्ध यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. दुसऱ्या लाटेत युवकांच्या
मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले. तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. सुदैवाने रुग्ण गंभीर होण्याचे, मृत्यूचे प्रमाण कमी होते. आता पुन्हा मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. या लाटेतही मृत्यूचे प्रमाण नव्हते. परंतु, आज एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.