पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा खून.

0
240

पिंपरी, दि. 4 (पीसीबी)-पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिल शिवशंकर शिंदे यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी प्रियसीच्या पतीसह तिघांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे हे वकील असून त्यांचे काळेवाडी येथे ऑफिस आहे. शिंदे हे ऑफिसमधून शनिवारी (ता.३१ डिसेंबर) दुपाराच्या सुमारास बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस तपास करीत होते. तपास करीत असताना, पोलिसांना शिवशंकर शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला होता.दरम्यान, मृत शिवशंकर शिंदे यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना आला होता. तिथे, तुटलेली बटन आणि रक्त आढळले होते. यामुळे त्यांचे अपहरण करून हत्या तर झाली नाही ना, या दिशेने पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करीत होते.

अॅड. शिवशंकर शिंदे यांचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला होता. त्याठिकाणाहून मदनुर येथील स्थानिक पोलिसांनी ३ संशयित ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अॅड. शिंदे यांचे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समजले. तसेच शिंदे यांचा याच अनैतिक संबंधातून अपहरण करून हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी शिंदे यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे आतापर्यंतच्या पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संबंधित महिलेचा पती, पतीचा भाचा आणि त्यांचा एक चालक यांचा समावेश आहे. आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.