पिंपरी चिंचवडच्या पर्यावरण समस्यांत लक्ष घालणार, मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

0
180

ग्रीन आर्मीचे अध्यक्ष प्रशांत राऊळ यांच्या आंदोलनाला यश

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोड, फसवी वृक्षगणना, नदी प्रदुषण, वायु प्रदुषण तसेच कचरा समस्या तसेच अनेक ठिकाणी झालेले पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन प्रकऱणात लक्ष घालण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. पर्यावरणवादी आणि पिंपरी चिंचवड ग्रीन आर्मीचे अध्यक्ष प्रशांत राऊळ यांनी त्याबाबत लेखी निवेदन दिले होते. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात विधीमंडळासमोर श्री. राऊळ यांनी दोन दिवसांचे धरणे आंदोलन केले. सराकरने त्यांची तत्काळ दखल घेतली.

आपल्या निवेदनात प्रशांत राऊळ यांनी शहरातील विविध पर्यावरण विषयक प्रश्नांवर मुद्देसूद मागण्या केल्या आहेत. मंत्री केसरकर यांना प्रत्यक्ष भेटून त्याबाबत चर्चा केली. त्यावेळी बोलताना सर्व समस्यांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रशांत राऊळ यांनी यापूर्वी मुंबईत जाऊन आझाद मैदान येथे देखील पर्यावरण दिनाच्या दिवशी एक दिवस लाक्षणित उपोषण केले. देशाच्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट ला दिल्ली येथे जंतरमंतर येथे देखील एकदिवसीय उपोषण केले. प्रामुख्याने बनावट वृक्षगणना प्रकरणात एकाही झाडाची मोजणी न करता सात कोटी रुपयांचे बिल अदा केल्याच्या गंभीर प्रकऱणावर राऊळ यांनी वारंवार आवाज उठवला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह त्याची बिलकूल दखल घेत नसल्याने श्री राऊळ यांनी आता सरकारचा दरवाजा ठोठावला आहे.

प्रमुख मागण्या अशा आहेत –
१. महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री मिळावा
२. पर्यावरण विषयक तक्रारी आणि तात्काळ मदतीसाठी एक आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना व्हावी
३. पिंपरी चिंचवड मधील वृक्षगणानेचा तपशील २ वर्षांपासून प्रसिद्ध केला जात नाहीये तो केला जावा , वृक्ष पुनः जे सध्या दुर्लक्षित केले जात आहे त्याला प्राधान्य देण्यात यावे.
४. पिंपरी चिंचवड मधील अनियंत्रित अवैध वृक्षतोडीच्या सर्व प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्यात
५. पिंपरी चिंचवड मधील नदी प्रदूषणावर तात्काळ व कडक कारवाही व्हावी
६. पिंपरी चिंचवड एक औद्योगिक शहर असल्याने औद्योगिक कचरा व्यवस्थापन हे सुनियोजित असावे, औद्योगिक कचरा जळण्याचे प्रमाण खूप मोठे आहे आणि त्याकडे पालिका आयुक्त दुर्लक्ष करत आहेत
७. शहराची ओळख ठरेल आशा वृक्ष संग्रहालयाला पिंपरी डेअरी फार्म ची जागा मिळावी. त्यासाठी पालिका राज्य सरकार ने MHA कडे पाठपुरावा करावा
८. शहरात single use प्लास्टिक ला बंदी घालावी
९. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे त्यासाठी दर महिन्याला १५ तारखेला “सार्वजनिक वाहतुक दिवस/Public Transport day” घोषित करावा व त्यादिवशी फक्त ₹१० इतकाच प्रवास शुल्क अकरावे
१०. शहरातील वायु प्रदुषण हे धोकादायक बनले आहेत त्यासाठी कचरा जळणाऱ्यांवर कारवाही करावी
११. पिंपरी चिंचवड शहरात फक्त नदीकाठ सुधार प्रकल्प न करता संपुर्ण नदी सुधार प्रकल्प व्हावा ज्यामध्ये नदी प्रणाली(ओढे,नाले, जिवंत झरे व त्यावरील अतिक्रमण) चा विचार व्हावा.
१२. शहरातील भुजल उपसा व ढासळणारी भुजल पातळी यासाठी अनधिकृत पाण्याचे टँकर, गाडी धुण्याची केंद व बोअरवेल वरती नियंत्रित ठेवावे. शहरी भागासाठी देखील जल आराखडे तयार करण्यात यावेत.
१३ रावेत येथील मेट्रो इको पार्कची जागा ही एक बनावट पंचनामा करून ती पडीक दाखवुन निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे.