पिंपरी-चिंचवडचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची बदली

0
31

दि.०१(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अखेर बदली झाली आहे. महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली असून, त्यांची सेवा मूळ वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांनी जारी केला आहे. दरम्यान, त्यांच्या जागेवर मोनिका ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या नावाची शिफारस केली होती ते डावलून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करून घेतली अशी चर्चा आहे.

जांभळे-पाटील यांची शासनाने २२ सप्टेंबर २०२२ राेजी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून दाेन वर्षांसाठी नियुक्ती केली हाेती. त्यानंतर पाटील यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. पाटील यांचा २२ सप्टेंबर २०२५ मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला हाेता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची सात ऑक्टोबर राेजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच म्हणजे १३ ऑक्टोबर राेजी जांभळे-पाटील यांनी महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याबाबत नगरविकास विभागाला पत्र दिले हाेते.तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांचे सर्वच काम जांभळे पाटील चोख बजावत होते. आता त्यांच्या विनंतीनुसार शासनाने जांभळे-पाटील यांची प्रतिनियुक्ती शुक्रवारी संपुष्टात आणली. मूळ वित्त विभागाकडे त्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे.

माेनिका ठाकूर यांची नियुक्ती

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी माेनिका ठाकूर यांची २० ऑक्टोबर राेजी नियुक्ती झाली हाेती. महसूल व वन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले हाेते. मात्र, नगरविकास विभागाचा आदेश नसल्याने आणि महापालिकेतील तिन्ही अतिरिक्त आयुक्तांची पदे भरलेली असल्याने ठाकूर यांना रुजू करून घेण्यास प्रशासकीय अडसर हाेता. आता जांभळे-पाटील यांची बदली झाल्याने महसूल विभागाच्या असलेल्या ठाकूर यांना रुजू करून घेणार की मुख्याधिकारी संवर्गातील अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती हाेणार, याबाबत प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता आहे.