पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा

0
233

पिंपरी दि. १४ (पीसीबी) –  पोलिसांसाठी वेगळा कायदा आहे की काय, असा प्रश्न पडतो.  सर्वसामान्यांच्या मोटारीला काळ्या काचा आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत. सर्वसामान्यांना लागू होणारा नियम पोलीस आयुक्तांना लागू होत नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येतो आहे. अगदी गेल्यात आठवड्यातील घटनेत एका सात वर्षांच्या मुलाला किडनॅप करुन हत्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या वाहनालाही काळ्या काचा असल्याने जीव वाचविण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या निष्पाप मुलाचा बळी गेला.

गुन्हेगार, दहशतवादी यांना लपता येऊ नये यासाठी मोटारीला काळ्या फिल्म असलेल्या काचा लावू नयेत असा आदेश शासनानेच काढला आहे. त्यानुसार पोलीस ठिकठिकाणी तपासणी करून काळ्या फिल्म लावलेल्या काचा असलेल्या मोटारींच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करतात. काळ्या फिल्म जागेवर काढून टाकण्यात येतात. पोलिसांच्या या कारवाईच्या धास्तीने मोटारीच्या काचांना काळी फिल्म लावणे, आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे वापरत असलेल्या मोटारीच्या काचा काळ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख काळ्या काचा असलेली मोटार वापरत असतील, तर त्यांच्यासाठी काही वेगळा नियम आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.