पिंपरी-चिंचवडचे पहिले अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती

0
252

पिंपरी, दि. ०८ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे पहिले अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात त्यांचा गुरुवारी (दि. 7) शपथविधी पार पडला.

मकरंद रानडे यांच्यासह शेखर चन्ने आणि डॉ. प्रदीप कुमार व्यास यांची देखील राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी आयुक्त पदाची शपथ दिली.

यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव उपस्थित होते.

मकरंद रानडे यांनी पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते काही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक देखील राहिले आहेत. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यावेळी ते शहराचे पहिले अपर पोलीस आयुक्त म्हणून शहरात आले होते. आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून त्यांनी काम पाहिले. आयुक्त कार्यालयाचा कारभार चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथून सुरु असताना रानडे यांनी प्रेमलोक पार्क येथील आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी करून तिथे आयुक्त कार्यालय आणि इतर कार्यालये निर्माण करण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली.

पिंपरी चिंचवड येथून ते अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून गेले. तिथून त्यांची सीआयडी मध्ये बदली झाली. तिथून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर राज्य माहिती आयुक्त पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांच्याकडे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त तसेच बृहन्मुंबई, औरंगाबाद खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याकडे अमरावती खंडपीठाचा कार्यभार आहे. तर नाशिक खंडपीठाचे आयुक्त भूपेंद्र गुरव यांच्याकडे कोकण खंडपीठाचा अतिरीक्त कार्यभार आहे