पिंपरी चिंचवडची संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादांच्या बरोबर, ५०० वर कार्यकर्ते मुंबईच्या बैठकीसाठी पोहचले

0
412

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्षांनी अजित पवार यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहे, मात्र १९९१ पासून अजितदादांनी या शहराची जडणघडण केली आहे. आता यापुढे तेच या शहराचा विकास अधिक गतीने करतील याची खात्री असल्याने सर्वजणांनी एकमुखाने दादांच्या बरोबर जायचे ठरवले आहे. आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५०० कार्यकर्त्यांचा ताफा सकाळीच मुंबईला रवाना झाला.

पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, आम्ही बैठक घेतली त्यात सर्वांनीच दादांच्या मागे जायचे ठरवले. तसा ठराव आम्ही एकमुखाने केला. या शहराला खरा चेहरा मिळाला तो अजित दादांच्या दूरदृष्टीमुळे. १९९१ पासून स्वतः अजितदादांनी शहराची सूत्र हातात घेतली आणि एका वेगळ्या उंचीवर हे शहर नेले. आज जो विकास दिसतो त्याचे खरे जनक अजितदादा आहेत. होय, निश्चितच दादांवर आमची मर्जी आहेच, पण मोठे साहेब म्हणजे शरद पवार साहेब हे आमचे श्रध्दास्थान आहे, दैवेत आहे. जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे. आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज मुंबई गाठली असून बैठकिला उपस्थित राहणार आहोत.

मुंबईला जाणाऱ्यांत अजित गव्हाणे यांच्यासह माजी विरोधीनेते नाना काटे, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, माजी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, जेष्ठ नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, राहुल भोसले, शाम लांडे, समिर मासुळकर, पंकज भालेकर, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, तुषार कामठे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष यश साने, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय अवसरमल, झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष संतोष निसर्गंध, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शशिकिरण गवळी, इश्वर ठोंबरे, विनोद नढे, संतोष कोकणे, सतिश दरेकर, प्रविण भालेकर, अतुल शितोळे, वसंत बोराटे, मंदाताई आल्हाट, शाम जगताप, विकास साने, प्रकाश सोमवंशी, फजल शेख यांच्यासह ५०० कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच पोहचला आहे.