हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश करावा
कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांची सूचना
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या ‘टॉप टेन’ पुरस्काराचे वितरण
पिंपरी : आयटीला चांगले दिवस आले आहेत. भविष्यात आणखी चांगले दिवस येणार आहेत. आयटीचा पुरस्कार केला पाहिजे. नवीन पिढीला ऑटो मोबाईल उद्योगाच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा. पिंपरी-चिंचवड-हिंजवडी महापालिका असे नामकरण करावे. त्यामुळे शहराची ओळख ऑटो मोबाईल उद्योगाबरोबरच आयटी हबही होईल, असे मत कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या दहा जणांचा ‘पीसीएमसी टॉप टेन’ पुरस्काराने फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख, उद्योजक कृष्णकुमार गोयल, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, अध्यक्षा सायली कुलकर्णी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, “पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या वाढली आहे. हुशार लोक आहेत. जवळच आयटी पार्क हिंजवडी, वाकड आहे. आता केवळ पिंपरी-चिंचवड नव्हे तर शहराबरोबर हिंजवडीचाही उल्लेख करावा. महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा. पिंपरी-चिंचवड, हिंजवडी महापालिका असे नामकरण करावे. त्यामुळे शहर केवळ ऑटो मोबाईल उद्योग नाही तर आयटी हबही आहे, असे नागरिकांना वाटेल. आयटीला चांगले दिवस आले आहेत. भविष्यात आणखी चांगले दिवस येणार आहेत. आयटीचा पुरस्कार केला पाहिजे. नवीन पिढीला ऑटो मोबाईल उद्योगाच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा विकास जोरदार होईल. पिंपरी-चिंचवड म्हणजे काय असे कोणी विचारले तर गणपती बाप्पा मोरया असे ऐकले का असे आपण सांगतो. मोरया गोसावीचे गाव म्हणजे पिंपरी- चिंचवड अशी ओळख सांगितली जात होती. त्यानंतर टाटा मोटर्स, एमआयडीसी आल्याने उद्योगनगरी अशी ओळख झाली. आता आयटी एक्सपोर्ट करणारी नगरी अशी ओळख व्हावी. त्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन द्यावे. पुढची पिढी तयार करणे गरजेचे आहे. आजच्या स्थितीत सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे. रोजगार उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत”.
” १९७० पासून माझा पिंपरी-चिंचवडशी संबंध आहे. भारतातील सर्वात मोठी एमआयडीसी पिंपरी-चिंचवडमधील आहे. शहरात टाटा मोटर्ससह मोठे उद्योग, कंपन्या आल्याने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा गौरव पिंपरी-चिंचवडला मिळाला. जकातीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत होते. पैसे कोठे खर्च करायचे असा प्रश्न होता. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी प्राधिकरणात जागा घेतली. आता कामगार तिथे राहतात. अगोदर कामगार पुण्यात वास्तव करत होते. पिंपरी-चिंचवड नावाचा मोठा परिणाम पुण्यावर झाला आहे. कारण, सवाई गंधर्व महोत्सव, फिल्म फेस्टिव्हल, फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यात आहे”, असेही ते म्हणाले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, “पिंपरी-चिंचवडने मला घडविले. शहराशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शहरातील पत्रकारांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे. पुण्याप्रमाणे शहरात पत्रकार संघाची स्वतंत्र इमारत उभी करावी. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल”.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना सध्याची पत्रकारिता, राजकीय परस्थिती याबाबत माहिती दिली.
पुरस्कारार्थी
कृष्णकुमार गोयल (सहकार व उद्योग क्षेत्र),
गणेश यादव (पत्रकारिता),
ऋतुराज गायकवाड (भारतीय क्रिकेटपटू),
इरफान सय्यद (कामगार क्षेत्र),
संदीप साकोरे (कला व नाट्य क्षेत्र),
विजय जगताप (लेखक व सामाजिक क्षेत्र),
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे (उत्तम प्रशासन),
डॉ. बी. सी. डोळस (वैद्यकीय),
पीसीईटी रेडिओ एफएम (प्रसार व मनोरंजन क्षेत्र) आणि अंजू सोनवणे (प्रेरणादायी रक्तदाते) यांचा ‘पीसीएमसी टॉप टेन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, सायली कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे पदाधिकारी सुनील कांबळे,रेहान सय्यद,गणेश शिंदे,विनय लोंढे,संतोष जराड,प्रसाद बोरसे,जितेंद्र गवळी,सूरज साळवे,शिवाजी घोडे,युनुस खतीब,मुकेश जाधव, शबनम सय्यद आदींनी परिश्रम घेतले.