१९ ते २१ सप्टेंबर ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे नाट्य प्रयोगकला महोत्सवाचे आयोजन
पिंपरी, दि. १६ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५” चे आयोजन १९ ते २१ सप्टेंबर पर्यंत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तथा प्रशासक आणि महोत्सवाचे निमंत्रक यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानंतर सात वाजता कर्नाटक श्री. इदागुणजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने कर्नाटक यांचे पंचवटी ही कथानाट्य असलेली – यक्षगान प्रयोगकला सादर होईल आणि सादरीकरणावर चर्चासत्र होईल अशी माहिती संयोजक व पैस रंगमंच चे संस्थापक प्रभाकर पवार यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत, पैस रंगमंच, चिंचवड पैस करंडक अंतर्गत शालेय नाट्यछटा आणि एकपात्री अभिनय स्पर्धा होईल. तसेच ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या निकट रंगमंचावर खुल्या गटाच्या मूकनाट्य, लघुनाटिका स्पर्धा होतील. सकाळी ९:३० वाजता, संस्कार भारती आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या सहयोगाने प्रदर्शन विभागात “चित्रकला प्रदर्शन” तर साहित्यिक श्रीकांत चौघुले यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक जडणघडणीचा वारसा” उलगडणारे “रंगदर्शन” या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल. सकाळी १० ते १२, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉल येथे कर्नाटक येथील यक्षगान मंडळींचे यक्षगानावर प्रयोगकला अभ्यासवर्ग – कार्यशाळा होईल. तर दुपारी २ ते ४ या वेळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी अकादमीचे पूर्वरंग (नांदी,नाट्यगीते व शास्त्रीय गायन) असे कार्यक्रम होतील.
या तीन दिवसीय महोत्सवात पैस करंडक स्पर्धेत नाट्यछटा, एकपात्री अभिनय, लघु नाटिका, मूकनाट्य व पथनाट्य स्पर्धा तर महोत्सवात रसिकांसाठी मराठी, हिंदी, कन्नड नाटकांसह चित्रकला प्रदर्शन व शहराचा सांस्कृतिक वारसा मांडणारे रंगदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमृता ओंबळे यांनी दिली.
शनिवारी (दि. २० सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता, पिंपरी चिंचवड परिसरात नाट्यकलेसह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या संस्थांचा “प्रयोगकला सन्मान” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यावेळी एनसीपीएच्या राजश्री शिंदे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, विभाग प्रमुख प्रवीण भोळे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यानंतर सायंकाळी सात वाजता, एनसीपीए मुंबई आणि नाशिक येथील सपान संस्थेचे “कलगीतुरा” हे मराठी नाटक सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल.
तत्पूर्वी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत, नाट्यगृह परिसरात महाविद्यालयीन व खुल्या पथनाट्य स्पर्धा होतील. यानंतर मुख्य रंगमंचावर दुपारी बारा वाजता, जयपूर राजस्थान येथील रंग मस्ताने संस्थेचे “महारथी” या फिजिकल थिएटर माध्यमातून हिंदी नाटकाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल.
रविवारी (दि.२१ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता, एफटीआयचे माजी विभाग प्रमुख प्रा. समर नखाते यांचा ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते “रंगानुभूति: सन्मान” देऊन गौरव करण्यात येणार आहे. यानंतर जेष्ठ नाटककार सतीश आळेकर लिखित आणि प्रसिद्ध नाट्य कलाकार सुव्रत जोशी आणि गिरीजा ओक यांची भूमिका असलेले राखाडी स्टुडिओ व बी बिरबल निर्मित “ठकीशी संवाद” या मराठी नाटकाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल.
तत्पूर्वी सकाळी दहा वाजता नाट्यगृहातील कॉन्फरन्स हॉल येथे रंग मस्ताने संस्था राजस्थानच्या कलावंतांच्या वतीने “फिजिकल थिएटर” आयोजित अभ्यासवर्ग – कार्यशाळा होईल. दुपारी १२:३० वाजता गदिमा नाट्यगृहातील निकट रंगमंचवर राजस्थानच्या अक्षय गांधी आणि कलाकारांचे ” एकलनाट्य कावडकथा – “माया” या हिंदी भाषेतील नाटकाचे सादरीकरण आणि त्यावर चर्चासत्र होईल. दुपारी दोन वाजता, मराठी रंगभूमीची १७५ वर्षांच्या गौरव गाथा मांडणारा महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभाग, मंत्रालय महाराष्ट्र शासन, मुंबईच्या वतीने निर्मित “उत्तररंग – एक खंड” च्या लेखिका वंदना घांगुर्डे यांची श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेणार आहेत.
या तीन दिवसीय महोत्सवाला प्रवेश विनामूल्य आहे; मात्र प्रवेशिका आवश्यक आहे. विनामुल्य प्रवेशिकां साठी व अधिक माहितीसाठी संयोजन समितीतील प्रियांका राजे यांच्या ८६००९००३९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रभाकर पवार आणि अमृता ओंबळे यांनी केले आहे.