पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरातील तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध

0
887

पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन अटल गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत.

सलमान रमजान शेख (वय 28, रा. साई श्रध्दा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), सतिश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार (वय 21, रा. खंडोबामाळ, आंबेडकरनगर, चाकण ता. खेड), शुभम रुपसिंग भाट (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी, हिंजवडी, वाकड परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सलमान रमजान शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोयता सारखी जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, चोरी व बेकायदेशिररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे नऊ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे पिंपरी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

चाकण परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सतिश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह गंभीर दुखापत, खंडणी गोळा करणे, यासारखे तीन गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

हिंजवडी परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार शुभम रुपसिंग भाट याने गावठी हातभट्टी तयार करणे, विक्री करणे अशा प्रकारचे सहा गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव हिंजवडी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

या तीनही प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए (महाराष्ट्र जातीय, समजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1980) कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. चालू वर्षात आयुक्तालयातील सात गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.