पोलिस चौकी मध्ये तक्रार घेण्यास पुन्हा सुरुवात करा, पिंपरी मर्चंट फेडरेशन ची मागणी
पिंपरी,दि. ७ – पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या की संपर्क करणे सोपे होते. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद पाळला.
यापूर्वी या पोलीस चौकीमध्ये देखील तक्रार नोंद करून घेतली जात होती ते आता होत नाही. बाजारपेठेपासून पिंपरी पोलीस स्टेशन हे पुणे मुंबई महामार्गावर ४ ते ५ किलोमीटर लांब आहे. तेथे तक्रार नोंद करायला गेलो की तेथील ठाणे अंमलदार नोंद करून घेण्याऐवजी तक्रार करण्यास केलेल्या व्यापाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. पथारी टाकून बसलेल्यांना हटवण्या ऐवजी त्यांनाच संरक्षण देऊन पोलीस दुकानदार, व्यापाऱ्यांना त्रास देतात. मागील आठवड्यात पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशा मागण्या करीत पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी (दि. ७) बाजारपेठ बंद ठेऊन पोलिसांचा निषेध केला.
अशा मागणीचे पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.