पिंपरीमध्ये खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – अण्णा बनसोडे

0
289

पिंपरी, दि.4 (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.

शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) आकुर्डी येथे अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. बनसोडे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माजी हरेश आसवानी, प्रसाद शेट्टी, नारायण बहिरवाडे तसेच राजेंद्र तरस आदी उपस्थित होते.

बनसोडे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही.

महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दिला असला तरी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना अन्य विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी परिस्थिती असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्द्यावर होत असलेली ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे. त्यातच अजितदादा पवार यांच्यासारखे ताकदीचे नेते देखील महायुतीत दाखल झाल्यामुळे निवडणूक सोपी झाली आहे. सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करून या निवडणुकीत नवा इतिहास घडवून दाखवतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

नेहरूनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल भोसले यांच्या कार्यालयासही खासदार बारणे यांनी भेट दिली. राहुल भोसले यांनी बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.