पिंपरीत आमदार अण्णा बनसोडेंची निष्क्रियता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर

0
180

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – दहा वर्षे आमदार असलेल्या अण्णा बनसोडे यांची अत्यंत निष्क्रीय कारकिर्द आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळावर आली आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या पिंपरीत आमदार बनसोडे यांचे कुठलेही ठोस काम नाही, पक्षसंघटनेत योगदान नाही, प्रशासनावर बिलकूल वचक नाही तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेशी संपर्क नसल्याने आता पक्षातच त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. मध्यंतरी बनसोडे हे शिंदे यांच्या शिवसेनेशी संधान बांधून होते म्हणूनही दादा समर्थक नाराज आहेत. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पिंपरीतून आमदार बनसोडेंना उमेदवारी दिलीच तर ही सिट गेली समजा, असे स्थानिक नेत्यांनी थेट दादांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे. महायुतीत चिंचवड आणि भोसरीतील भाजप आमदारांच्या जागा त्यांना परत मिळतीलही पण, पिंपरीची जागा हातातून गेलीच तर शहरात राष्ट्रवादीच्या अस्तित्वालाच सुरूंग लागणार असल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.

आमदार बनसोडे यांनी २००९ मध्ये निसटता विजय मिळविला. पुढे २०१४ मध्ये ते अखंड शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्याकडून पराभूत झाले. गेल्यावेळी २०१९ मध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगातप यांचा छुपा पाठिंबा मिळाल्याने त्यांनी चाबुकस्वार यांचा पराभव केला. आता पुन्हा २०२४ मध्ये महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे. दोन वेळा आमदारकी मिळूनही बनसोडे यांनी कुठलेच ठोस काम केलेले नसल्याने मत कसे मागायचे म्हणून कार्यकर्ते काम करायला तयार नाहीत, तर मतदारांतसुध्दा तीव्र नाराजी आहे.

पिंपरी राखीव मतदारसंघात झोप़डपट्टी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रश्न आजही कायम आहे. आमदार बनसोडे यांना एकही प्रकल्प राबविता आलेला नाही म्हणून झोपडपट्टीतील मतदारांत खदखद आहे. प्राधिकरणाग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न भाजपच्या दोन्ही आमदारांनी लावून धरला आणि सोडविला. विधानसभेत आमदार महेश लांडगे आणि अश्विनी जगताप यांच्याकडून शहराच्या समस्यांवर विविध विषयांवर चर्चा उपस्थित केली जाते आणि त्या कामांचा पाठपुरावा केला जातो. आमदार बनसोडे यांनी विधामंडळात कधीही तोंड उघडलेले नाही अथवा कुठला प्रश्न विचारल्याचे वृत्त नाही. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी दोन्ही आमदार अनुक्रमे लांडगे आणि श्रीमती जगताप हे कायम आग्रही असतात. रस्ते, पूल, उड्डाण पुल, स्मार्ट सिटी अंतर्गत हजारो कोटींचा कामे त्यांनी केली. तुलनेत पिंपरी मतदारसंघात एकही विकास काम दाखविता येत नाही.

गोळीबार प्रकरणात राष्ट्रवादीची राज्यभर बदनामी –
आमदार बनसोडे यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळीबार झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. सखोल तपासात सर्व खोटारडेपणा उघड झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर मोठी बदनामी झाली. आमदार बनसोडे यांचे चिरंजीव सिध्दीर्थ यांने टोळक्यासह नेगरूनगर परिसरात राडा केला म्हणून तत्कालिन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याला शोधून काढले आणि कारवाई केली होती. कारवाई होऊच नये यासाठी बनसोडे हे दबाव आणत होते. माध्यमांनी प्रकरण लावून धरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड लपवायची वेळ आली होती. फुले-शाहू-आंबेडकर हाऊसिंग सोसायटीच्या नावाखाली मागासवर्गातील शेकडो नागरिकांना तसेच शासनालाही फसविण्यात आल्याचे प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली असून तेसुध्दा आमदार बनसोडे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सर्व प्रकरणे प्रचारात आली तर पक्षांची नाचक्की होईल म्हणून पुन्हा आमदार बनसोडे यांना उमेदवारी देण्यास प्रमुख पदाधिकाऱ्यांचाच विरोध आहे.

चाबुकस्वार, सावळे, सोनकांबळे, शिलवंत, गोरखे –
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे रिपाईच्या प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे युवा नेते आणि अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे तसेच महाआघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत-धर आदी रथीमहारथींची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे चाबुकस्वार यांनी पाच वर्षे आमदार म्हणून काम केले. लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान त्यांनी महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. प्रत्याक्षात पिंपरीगाव आणि पिंपरी बाजारपेठ
वाघेरे पाटील यांना नव्हे तर महायुतीचे श्रीरंग बारणे यांना १७ हजारीची आघाडी मिळाल्याने चाबुकस्वार यांच्यावर ठपका आला. चाबुकस्वार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी बाजारपेठ आणि पिंपरी गावातच संजोग वाघेरे यांचे मताधिक्य घटल्याने आता उदवारी देतानाही त्याचा विचार होऊ शकतो. महापालिकेत सलग पाच टर्म नगरसेवक राहिलेले चाबुकस्वार यांनी क्रीडा क्षेत्रातही भरीव काम केलेले आहे. मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प त्यांच्याच पुढाकाराने झाला.

सलग तीन टर्म नगरसेविका तसेच २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता असताना पहिली मागासवर्गिय महिला स्थायी समिती अध्यक्ष होण्याचा मान मिळालेल्या सीमा सावळे यासुध्दा प्रबळ दावेदार आहेत. समिती अध्यक्ष असताना त्यांनी
रेकॉर्डब्रेक तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली. अत्यंत आक्रमक, अभ्यासू नगरसेविका अशी त्यांची ख्याती आहे. भ्रष्टाचाराची असंख्य प्रकऱणे त्यांनी बाहेर काढल्याने भ्रष्टाचाऱ्यांच्या कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा आहे. महापालिका प्रशासनावर त्यांचा कायम वचक असल्याने जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्या राबवितात.

भाजपच्या पाठिंब्यावर रिपाईच्या उमेदवार म्हणून चंद्रकांता सोनकांबळे यांनी दोनदा लढत दिली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही महापालिकांतून नगरसेवकपदाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या खंद्या समर्थक तसेच रिपाई चळवळीतील अभ्यासू कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. आठवले केंद्रीय मंत्रीमंडळात आहेत म्हणून रिपाईसाठी ही एक जागा सोली तर सोनकांबळे यांच्याच नावाला पसंती आहे.

सुलक्षणा शिलवंत या प्रथमच नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना पिंपरीतून त्यांना उमेदवारी मिळाली होती, पण या दोघांपैकी बनसोडे यांचाच एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आल्याने त्यांची संधी गेली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून त्या उमेदवारी मागत आहेत. माजी खासदार श्रीनिवाल पाटील यांच्या कट्टर समर्थक असा त्यांचा परिचय आहे.
भाजपचे अमित गोरखे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून गोरखे यांनी काम केले आहे. गोरखे यांचा जोरदार प्रयत्न आहे, महायुतीच्या घटकपक्षांतून त्यांच्या नावाला विरोध आहे. काँग्रेस मधून डॉ. मनीषा गरुड ह्यांचेही नाव इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे डेंटिस्ट असलेल्या डॉ. गरुड ह्यांनी तीन वर्ष पूर्वी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी लोकसंपर्क वाढविला आहे.