पिंपरी मर्चंट फेडरेशन ची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, ( पीसीबी ) दि .३ – पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी, तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि बाजारपेठांमध्ये दिवस, रात्र पोलीस गस्त वाढवावी अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद करण्यात येईल असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष, उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे.
तसेच पत्र फेडरेशन ने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात दिले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. यामुळे व्यापारी भयभीत झाले असून त्यांच्या वित्त व जीवितहानी विषयी भीती निर्माण झाली आहे. याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश द्यावेत अशीही मागणी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शुक्रवारी पिंपरीतील एका युवा व्यापाऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला यामध्ये व्यापारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड मध्ये एकच खळबळ उडाली. पिंपरी बाजारपेठ परिसरात यापूर्वी देखील व्यापाऱ्यांवर दहशत बसवण्यासाठी अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. त्याबाबत व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पोलिसांना पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या वतीने निवेदन देऊन पोलीस संरक्षण व पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तरी देखील पोलिस प्रशासन दखल घेत नाही आता फेडरेशनने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.