पासपोर्ट प्रकरणात घायवळला पोलिसांची ‘क्लिन चिट’?

0
2

दि.१४ (पीसीबी) -पुण्यातील कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळ याच्याविरोधातील तपासात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवला, ही माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी स्थानिक पोलिसांनी ‘स्वच्छ पडताळणी अहवाल’ दिला होता, ज्यामुळे आता पोलिस संगनमताचा संशय गडद होऊ लागला आहे.

घायवळने २०१९ साली अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता. त्यासाठी त्याने खोटे पत्त्याचे आणि ओळखीचे पुरावे सादर केले. अधिक चिंतेची बाब म्हणजे, त्या वेळी स्थानिक पोलिस ठाण्याने त्याच्या पार्श्वभूमीची पडताळणी करताना त्याच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत, “स्वच्छ अहवाल” सादर केला.या प्रकरणात पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून आल्याने, आता चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. डीएसबी विभागातील अधिकाऱ्यांना घायवळची पार्श्वभूमी माहीत नसणे अशक्य असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


पासपोर्टसारखा संवेदनशील दस्तावेज मिळवण्यासाठी घायवळने आपले आडनाव बदलून आपली गुन्हेगारी ओळख लपवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे संकेत मिळत असून, या सगळ्यामागे एखाद्या वरिष्ठ नेत्याचा हात असल्याचीही चर्चा आहे.

पुणे पोलिसांनी सर्व संबंधित कागदपत्रांची मागणी करून तपास सुरू केला आहे. पासपोर्ट पडताळणीवेळी कोणती कागदपत्रे सादर झाली, ती कशी मंजूर झाली, आणि त्यामागे कोण आहे याचा तपास सध्या प्रगतीपथावर आहे. याशिवाय, दुसऱ्याच्या नावावर सिमकार्ड वापरणे, मनी लॉन्डरिंग, आणि जप्तीची कारवाई अशा अनेक गुन्ह्यांचा तपासही सुरू आहे.या प्रकरणामुळे निलेश घायवळविरुद्ध नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, तपासात जर पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा संगनमत सिद्ध झाले, तर काहींच्या करिअरवर गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या संपूर्ण शहराचे लक्ष पुणे पोलिसांच्या चौकशीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.