पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

0
115

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) पुणे, : मान्सूनच्या पावसाची पुणे परिमंडलात सध्या हजेरी सुरु आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा आणखी जोर वाढणार आहे. या पार्श्वभूमिवर महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधन सामग्रीसह वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देत आहेत.

   पावसाळ्यातील नियोजनाबाबत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी नुकताच आढावा घेतला. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व विभागातील अभियंता, कर्मचाऱ्यांनी सतर्क व तत्पर राहावे. मुसळधार पाऊस व अन्य संबंधित कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा. त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय करावी आणि वीजयंत्रणेच्यादुरुस्तीचे कामे देखील वेगाने करावेत असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले, की पावसामुळे वीजयंत्रणेतील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तत्परतेने उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बिघाड गंभीर असल्यास संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेग द्यावा. खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती ग्राहकांना देण्यासोबतच विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षेबाबत जागरूक राहून यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

पावसात वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे– प्रामुख्याने पुणे व पिंपरीचिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना क्षती पोहोचल्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्रॉन्क्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. यासोबतच वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हीस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे आदींमुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे.

अभियंते व कर्मचाऱ्यांकडून अविश्रांत दुरुस्ती काम- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा असते. मात्र अत्यंत खडतर परिस्थितीत भर पावसात व रात्री देखील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंता, कर्मचारी राबत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्राथमिक चाचणी घेतली जाते. त्यामधून वीज सुरळीत झाली नाही तर लगेच पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला जात आहे. पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट देणे आदी कामे करावी लागत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून ही कामे करावी लागत आहेत. भूमिगत वीजवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली किंवा रस्त्याची उंची वाढल्याने खूप खोल असल्यास वेगळी वीजवाहिनी टाकून वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच उपरी वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्यास ती बाजूला करणे, नवीन वीज तार टाकणे, पीन किंवा डिस्क इन्सूलेटर बदलणे आदी कामे करण्यात येत आहेत. पावसाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.